

पालघर शहर ः पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर भारताचा मार्क्सवादी लेनेनवादी पक्षाच्या वतीने धडक मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शनी करण्यात आली. विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, महिला या आंदोलनात सहभागी झाले.
पिढ्यानपिढ्या कसत असलेली वन जमीन आदिवासींच्या नावे करावी. पालघर तालुक्यातील परनाळी येथे आदिवासी तरुणाच्या मारहाण प्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपींवर अटक करून कारवाई करण्यात यावी. मनरेगा योजनेत केलेले बदल हे आदिवासी कामगारांवर अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला असून हे बदल रद्द करण्यात यावेत. वसई विरार महापालिकेने आजतगायत शबरी आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजूर केले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत हद्दीतील बांधकाम बहुउद्देशीय हॉल, झोपडी, घर इत्यादींवर तात्काळ घरपट्टी आकारणी करून कर वसुली करून ग्रामपंचायतींचे उत्पन्न वाढवावे. आदींसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी भारताचा मार्क्सवादी लेनिनवादी पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आणि विविध मागण्यांचे निवेदन शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.