

वाडा: मनोर-वाडा-भिवंडी महामार्गावर काँक्रीटीकरणाचे सुरू असणारे संथगतीचे काम, जागोजागी केलेले खोदकाम, निकृष्ट कामाचा आरोप, अपघातग्रस्तांची वाढत असलेली संख्या व प्रशासनाची कुचकामी भूमिका याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने वरले गावाजवळ अर्धातास रास्तारोको आंदोलन करण्यात आले. आलमान गावातील अपघातग्रस्त मृत व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.
आलमान गावातील रमेश पवार या व्यक्तीचा 17 एप्रिलला वरले गावाजवळ रस्त्याच्या खोदकामामुळे अपघात झाला, ज्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. कंत्राटदार कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला मात्र रमेश हे घरातील एकमेव कमावते असल्याचे त्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होती.
बुधवारी काही नेते व कार्यकर्त्यांनी मनोर-वाडा महामार्गावर वरले गावाजवळ रास्तारोको आंदोलन करून घोषणाबाजी केली यावेळी आंदोलकांपेक्षा पोलिसांचीच संख्या अधिक असल्याचे बघायला मिळाले.
पोलीस, कंत्राटदार कंपनी व पिडब्लुडी विभाग यांची मिलीभगत असल्याने रस्त्याची कामे अपूर्ण व जीवघेणी बनली असून तिन्ही विभाग कुणालाही जुमानत नाहीत असा आरोप आंदोलकांनी केला.
काँक्रीटीकरण अतिशय संथ व कुचकामी पद्धतीने सुरू असल्याचा आरोपही आंदोलकांनी केला असून पावसाळ्याच्या आधी रस्ता सुकर करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. पोलीस निरीक्षक दत्तात्रय किंद्रे यांनी आंदोलन आटोपते घ्या व रस्ता मोकळा करा अशा सूचना करताच आंदोलन आटोपते घेण्यात आल्याने वाहनचालकांना दिलासा मिळाला.