

पालघर शहर: आर्थिकदृष्ट्या मागास आणि वंचित घटकातील बालकांसाठी असलेल्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत 25 टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया पालघर जिल्ह्यात राबवण्यात येत आहे. जिल्ह्यातील पहिल्या निवड यादीतील एकूण 3 हजार 183 विद्यार्थ्यांपैकी आतापर्यंत 2 हजार 425(76.18 टक्के) विद्यार्थ्यांनी आरटीई अंतर्गत आपले प्रवेश निश्चित केले आहेत. या प्रक्रियेसाठी शासनाने दुसऱ्यांदा 8 मे पर्यंत मुदतवाढ दिल्याने अद्याप प्रवेश न घेतलेल्या उर्वरित विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पालघर जिल्ह्यातील 268 शाळांमधील 5 हजार 685 रिक्त जागांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. सुरुवातीला प्रवेशाचा वेग काहीसा मंद होता, मात्र शासनाने वेळोवेळी दिलेल्या मुदतवाढीमुळे प्रवेशाची टक्केवारी 66 वरून 76 टक्क्यांवर पोहोचली आहे. पहिल्या यादीतील प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त जागांसाठी 2 हजार 206 विद्यार्थ्यांची प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात येणार आहे.
कागदपत्र पडताळणीचे आवाहन ज्या पालकांच्या पाल्यांची निवड पहिल्या यादीत झाली आहे, त्यांनी कागदपत्रांचे दोन संच तयार करून तालुका स्तरावरील पडताळणी समितीकडून तपासून घेणे अनिवार्य आहे. त्यानंतरच संबंधित शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करता येईल. 8 मे ही अंतिम मुदत असून, त्यानंतर पहिल्या यादीतील प्रवेशाची संधी संपण्याची शक्यता आहे.
तांत्रिक अडचणींमुळे मुदतवाढ अनेक पालकांना कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यास वेळ लागत होता तसेच तांत्रिक अडचणींमुळे काही पालकांना प्रवेश निश्चितीचे मेसेज मिळण्यास उशीर झाला. ही अडचण ओळखून शासनाने 21 एप्रिलपासून सुरू झालेली मुदत आता 8 मे 2026 पर्यंत वाढवली आहे.
पालकांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता त्वरित आपली कागदपत्रे पडताळणी समितीकडे सादर करावीत असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी (प्राथमिक) यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी पालकांनीया अधिकृत संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन करण्यात आले.