

सफाळे ( पालघर ) : स्थानिक नागरिकांची दीर्घकाळची मागणी पूर्ण झाली असून लोकशक्ती एक्सप्रेसचा थांबा आता सफाळे येथे मंजूर झाला आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून, रेल्वे प्रशासनाकडून लवकरच हिरवा झेंडा दाखवून या थांब्याची सुरुवात होणार असल्याचे कळते.
कोरोना काळात रद्द झालेला हा थांबा पुन्हा सुरू झाल्याने सफाळे व पंचक्रोशीतील मुंबईकडे जाणाऱ्या व्यवसायिक व नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे. पहाटेच्या वेळी प्रवासासाठी होणारी अडचण, तसेच परिसरातील भाजीपाला, फुले, दूध यांसारख्या मालवाहतुकीसाठीची अडचणही दूर होणार आहे. आतापर्यंत पर्यायी व्यवस्था करावी लागत असल्याने वेळ, पैसा आणि मेहनत वाया जात होती.
या निर्णयामुळे सफाळे, पालघर व आसपासच्या विद्यार्थी, व्यावसायिक आणि दैनंदिन प्रवाशांना प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होणार आहे. त्याचबरोबर या भागाच्या विकासालाही गती मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. या संदर्भात खासदार डॉ. हेमंत सवरा म्हणाले सफाळे स्थानकावर लोकशक्ती एक्सप्रेसचा थांबा हा आपल्या सर्वांच्या सहकार्याने शक्य झाला असून, हा प्रवाशांसाठी मोठा दिलासा आहे.