

पेण (ठाणे) : गणेशोत्सवाची धामधूम सुरु असतानाच पेणकरांसाठी रेल्वे मंत्रालयाने एक भेट दिली आहे. कोरोना साथीत बंद करण्यात आलेला दिवा सावंतवाडी या रेल्वेगाडीला आता पेण स्थानकात पुन्हा थांबा देण्यात आला आहे.
रायगड जिल्ह्यातील पेण शहर रेल्वे स्टेशन असूनही काही रेल्वे थांबत नसल्याने प्रवाशांसाठी मात्र बिनकामचे ठरत होते. मात्र प्रवाशांची दीर्घकाळापासूनची प्रतीक्षा संपणार असून केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिवा-सावंतवाडी रेल्वेला पुन्हा पेण येथे थांबा देण्यास मान्यता दिली आहे. या रेल्वेला यापूर्वी पेण येथे थांबा होता. मात्र त्यानंतर कोरोनाच्या साथीपासून पेण येथील गर्दीचा थांबा कमी करण्यात आला. पेण तालुका हे रायगड जिल्ह्यातील महत्त्वाचे केंद्र असून येथून मुंबई व कोकणदरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या प्रचंड आहे. त्यामुळे या थांब्याची मागणी गेल्या
अनेक वर्षांपासून वारंवार होत होती. खा. धैर्यशील पाटील यांनी या प्रश्नावर सातत्याने संसदेत वेळोवेळी ही मागणी उचलून धरली होती. पाठपुरावा करून रेल्वेमंत्र्यांना पत्राद्वारे व प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर माहिती दिली होती. या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद देत रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मंत्रालयाने मान्यता दिली आहे.
पेण तालुक्यातील हजारो प्रवासी दररोज मुंबई-कोकणदरम्यान प्रवास करतात. पेणला गाडीचा थांबा नसल्यामुळे प्रवाशांना दिवा, पनवेल किंवा रोहा येथे जावे लागत होते. आता थांबा मिळाल्याने वेळ आणि खर्च दोन्ही वाचणार आहेत. स्थानिक व्यापारी संघटनेच्या प्रतिनिधींनीही या निर्णयाचे स्वागत केले आहे. पेण शहर हे व्यापारी दृष्ट्या देखील महत्त्वाचे असून रेल्वे थांबा मिळाल्याने व्यवसायालाही चालना मिळेल, असे मत व्यक्त करण्यात आले. या निर्णयामुळे आता पेण परिसरातील प्रवाशांना मुंबई-कोकण प्रवासासाठी थेट सुविधा उपलब्ध होणार असून दैनंदिन प्रवास व लांब पल्ल्याचा प्रवास अधिक सुलभ व सोयीस्कर होणार आहे.