

खोडाळा : दीपक गायकवाड
ठाणे मुंबईसह नाशिक जिल्ह्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मोखाडा तालुक्यातील सुप्रसिद्ध गणेश मंदिर परिसरात शनिवार दि 15 रोजी संध्याकाळी दोन बिबटे आढळून आलेले आहेत. या मार्गावरुन खोडाळा येथून मोखाडा येथे प्रवास करणाऱ्या मोटारी समोरच एक बिबट्या रस्ता ओलांडून मंदिराकडे येत असल्याचे पाहून वाहन चालकांनी त्याला वाट मोकळी करून दिली आहे.याठिकाणी अधिक चौकशी केली असता येथे बिबटे आढळून आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे.
संध्याकाळी 7-30 ते 8 वाजेच्या दरम्यान खोडाळा कडून येणाऱ्या उतारावरून येथे असलेल्या वडापावच्या टपरीला खेटून सदरचा बिबट्या उतरला असल्याचे येथील ग्रामस्थ श्री घाटाळ यांनी सांगितले आहे.तर अशाच प्रकारे ग्रामस्थांना एकून दोन बिबटे दिसले असल्याचे सोमनाथ जाबर यांनी स्पष्ट केले आहे.त्यामूळे मंदिर परिसरात वास्तव्य करून असलेल्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यापूर्वीही खोडाळा येथेही जंगल डेपो परिसरात बिबट्याचा वावर असल्याची वदंता होती. किंबहूना तसा भितीदाखल तक्रारींचा सुर ऐकू येत होता.मात्र हाकेच्या अंतरावर असलेल्या देवबांध येथे बिबट्या दिसला असल्याने खोडाळा येथील वृत्ताला त्यामुळे दुजोरा मिळत आहे.त्यामूळे वनविभागाने हे बिबटे प्रकरण गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
भारत पेट्रोल पंप परिसरात रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या मोटारसायकल चालकावर बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे नागरिकांनी बोलताना सांगितले आहे.मागील आठ,नऊ दिवसांपासून मोखाड्यातील वारघडपाडा,तळ्याचापाडा,ग्रामीण रुग्णालय परिसरात सायंकाळच्या सुमारास बिबट्याचा मुक्त संचार करत सगळीकडे फिरत असल्याचे अनेक नागरिकांनी बघितले आहे.त्यामुळे मोखाडा परिसरात भितीचे वातावरण तयार झाले आहे.
सोमवारी रात्रीच्या वेळेस नाशिक डहाणू महामार्गावरून प्रवास करणाऱ्या मोटारसायकल चालकांवर भारत पेट्रोल पंप परिसरात हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे.मात्र आठ,नऊ दिवसांपासून मोखाडा परिसरात एरिया बदलून फिरणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्याचा प्रयत्न मोखाडा वन विभागाकडून होत नसल्याने बिबट्याने आत्ता थेट खोडाळ्याकडे मजल मारली आहे.