

तलासरी : करजगाव आणि धामण गावांमध्ये (ता- तलासरी , जि-पालघर) बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
शनिवारी (दि.३) सकाळी करजगाव येथे चिकूच्या वाडीत काम करत असताना गुलाब मधु वरठा या महिलावर झुडपात लपून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या उजव्या हाताला आणि पाठीवर, मानेखाली गंभीर जखमा झाल्या आहेत. मात्र, धाडसाने त्यांनी आरडा ओरड करत बिबट्याला पळवून लावले.
या घटनेनंतर काही वेळातच धामण गावातील मिर्ची लागवड केलेल्या शेतात काम करत असलेल्या राज्या काकड्या चिमडा या शेतकऱ्यावर देखील बिबट्याने हल्ला चढवला. या हल्ल्यात राज्या यांच्या हातावर, पोटावर आणि पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत. बिबट्याच्या या सलग दोन हल्ल्यांमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.
हल्ल्यानंतर बिबट्या गावातच थांबून राहिला होता. तो यशवंत चिंमडा यांच्या घराशेजारील कोंबड्याच्या खुराड्यात लपून बसलेला आढळून आला. यामुळे संपूर्ण गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या उन्हाचे चटके तीव्र असल्यामुळे शेतकरी पहाटेच शेतात कामासाठी जातात. मात्र, बिबट्याच्या या सततच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी संबंधित ठिकाणी जाळी लावून सापळा तयार केला असून, त्याला सुरक्षितरित्या पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.