बेलापूर : मोटारसायकलने घरी परतणार्या बापलेकांवर बिबट्याने प्राणघातक हल्ला केला. त्यात सार्थक मुक्ताजी जाटे (वय 13, रा.गळनिंब-जाटेवस्ती) याच्या पायाला बिबट्याने चावा घेतल्याने तो जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान चांडेवाडी-राजूरी रोडवर ही घटना घडली.
मुक्ताजी जाटे आणि मुलगा सार्थक दोघे मोटारसायकलने गळनिंबला घरी जात होते. रस्त्यावर बिबट्याने मोटारसायकलवर झेप घेत दोघांवर प्राणघातक हल्ला चढविला. बिबट्याने सार्थकच्या पायाला चावा घेतला. प्रसंगावधान राखत जाटे यांनी मोटारसायकल पळविली. सार्थकला तत्काळ गावातीलच रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र जखम गंभीर असल्याने त्यास लोणी येथे हलविण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास घरी सोडून आले आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले. शेतातील ऊसतोडणी सुरू असल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा मिळत नाही. त्यामुळे बिबटे सरभैर झाल्याचे चित्र आहे.
अंगणात खेळत असलेल्या 3 वर्षीय चिमुरडीचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना गळनिंब शिवारात ही घडली होती. ज्ञानेश्वरी नामदेव मारकड असं या मुलीचं नाव आहे. ज्ञानेश्वरी घराच्या अंगणात आजीच्या कुशीत खेळत असताना बिबट्याने आजीसमोर तिला उचलून नेले होते. पाच वर्षीपूर्वी घडलेल्या या घटनेची आठवण या हल्ल्याने पुन्हा ताजी झाली आहे
जाटे वस्ती येथील शिव रस्त्त्यावर वनविभागाने पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा. ऊसतोड सुरू असल्याने बिबट्याला लपण्यास जागा नसल्याने तो मानवी वस्तीत आला आहे. बिबट्याच्या भितीने नागरिक रात्री घराबाहेर पडण्याची धजावत नाहीत.
शिवाजी चिंधे, सरपंच, गळनिंब