

पालघर: मोखाडा तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीचे वीजबिल थकल्याने शहरातील स्ट्रीट लाईट बंद झाली आहे. वीजबिल भरून स्ट्रीट लाईट पुन्हा चालू होईल अशी अपेक्षा खोडाळावासीयांना होती. मात्र गेल्या पंधरा दिवसाहून अधिक कालावधी नंतरही हे वीजबिल न भरल्याने खोडाळा शहर अंधारमय झाले आहे.
यामुळे ग्रामपंचायतीच्या या कारभाराबाबत लोकांमध्ये नाराजी असून खोडाळा येथील बोहाडा उत्सव देखील अगदी तोंडावर आलेला असताना अद्याप पर्यंत हे वीज बिल न भरल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसापासून एवढे मोठे शहर अंधारात असल्याने संताप व्यक्त होत आहे. यामुळे आता हे वीज बिल भरणार कोण आणि कधी हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच राहत आहे.
रात्रीच्या वेळी सार्वजनिक खांबावरील दिवे हे त्या शहराचे वैभव समजले जाते आणि यातून शहराच्या सौंदर्यात भर पडतेच याही पेक्षा या स्ट्रीट लाईटमुळे अनेकदा शहरात वावरणे अधिक सोयीचे जाते. याशिवाय चोरी होणे छेडछाड होणे अशा प्रकारावर देखील एक प्रकारे आळा बसतो. यामुळे एवढ्या मोठ्या शहराची स्ट्रीट लाईट बंद असणे म्हणजे एकप्रकारे ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप व्यक्त होत आहे.
मोखाडा तालुक्यातील खोडाळा ही सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते मोखाडा नगरपंचायत झाल्यानंतर उरलेल्या ग्रामपंचायतीमध्ये आसे आणि खोडाळा या दोन्ही ग्रामपंचायत अतिशय मोठ्या आणि महत्त्वाच्या मानल्या जातात.
मात्र सध्या खोडाळा ग्रामपंचायतच्या स्ट्रीट लाईट वीज बिल न भरल्याने महावितरण कडून बंद करण्यात आल्याने शहरच गेल्या 15 ते 20 दिवसापासून अंधारात असल्याचे दिसून येत आहे या स्ट्रीट लाईट साठी पाच वीज मीटर वरून विद्युत जोडणी झाली आहे या पाच ही मीटरची बाकी पाहता 2 लाख 64 हजार, 1 लाख 13 हजार 48 हजार 138 44हजार 164 आणि 27 हजार 371 अशी एकूण वीज बिलांची थकबाकी 4 लाख 85 हजार 534 इतकी झाल्याने अनेकदा मुदतवाढ देऊनही खोडाळा ग्रामपंचायतीकडून ही बाकी भरली नसल्याने महावितरणकडून हा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे.
यामुळे एवढे मोठे शहर वीजबील थकबाकीमुळे चक्क अंधारात असल्याने ग्रामपंचायत प्रशासन आणि तेथील लोक प्रतिनिधी नेमके काय करतात असा सवाल आता खोडाळा वासीय करीत आहेत. ही स्ट्रीट लाईट बंद होऊन आता 15 हून अधिक दिवस झाले आहेत. मात्र अगदी काही दिवसात खोडाळा येतील बोहाडा म्हणजेच मोठी यात्रा देखील होणार आहे. अशावेळी सार्वजनिक पथदिवे जर बंद असतील तर हा उत्सव साजरा कसा होणार ?असा प्रश्न आता विचारला जात आहे.
“ दोन लाखांच्या आसपास वीज बिल थकले आहे. या अगोदर जिल्हा परिषदेकडून हे बिल भरले जात होते. मात्र आता ते देण्यात आले नाही. यामुळे आमच्या वित्त आयोगाच्या निधीतून भरता येईल का याबाबत पुढील कार्यवाही चालू आहे.
- डी.डी दोंदे, ग्रामविकास अधिकारी, खोडाळा ग्रामपंचायत.