

दीपक गायकवाड ः खोडाळा
खोडाळा आदिवासी सेवा सहकारी संस्था खोडाळा यांचेकडील सभासदांच्या सहभागातून उभ्या राहिलेल्या गोदामाची आजमितीला अतिशय दुरवस्था झालेली आहे.सन 1991 च्या दरम्यान खोडाळा सेवा सहकारी संस्था दिवाळखोरीत गेल्याने सभासदांच्या सहभागाने उभ्या राहिलेल्या इमारती आणि जमीनी लिक्विडेटरच्या अर्थात सहकार विभागाच्या ताब्यात गेल्या आहेत. सहकार विभागाकडे देखभाल दुरुस्तीसाठी अपेक्षित निधीची तरतूद नसल्याने त्यामुळे आज घडीला येथील विस्तारित गोदाम दुर्लक्षित राहिल्याने त्याची अक्षरशः वाताहत झालेली आहे.
पूर्वीची खोडाळा आदिवासी सेवा सहकारी संस्था दिवाळखोरीत गेल्यामुळे त्यांचे विकेंद्रीकरण होऊन खोडाळा, आडोशी आणि वाकडपाडा अशा 3 स्वतंत्र सहकारी संस्था अस्तित्वात आल्या आहेत.खोडाळा आदिवासी सेवा सहकारी संस्था दिवाळखोरीत गेल्यामुळे सन 1990-91 सालापासून संस्थेकडील सभासदांच्या सहयोगातून संपादीत केलेली मालमत्ता जसे की भुखंड आणि त्यावरील इमारती आणि त्याव्यतिरिक्त असलेली खुली जागा ही आदिवासी सेवा सहकारी संस्थाच अवसानात (लिक्विडेशन ) गेल्याने अनायसे सहकार विभागाच्या ताब्यात गेलेली आहे.
त्यानंतर दरम्यानच्या कालावधीत संस्थेच्या सहकार विभागाच्या ताब्यातील विस्तारित गोदाम आणि परिघातील परिसरात आदिवासी विकास महामंडळाचे एकाधिकार धान्य खरेदी केंद्र सुरू करुन बंदीस्त जागेचा खरेदी केलेले धान्य साठविण्यासाठी उपयोग केला जात होता.मात्र मागील अनेक वर्षे आदिवासी विकास महामंडळाकडून चालविली जाणारी एकाधिकार खरेदी केंद्र बंद करण्यात आलेली होती.
दरम्यानच्या अवधित आदिवासी विकास महामंडळाने गोदामाच्या वास्तूचा उपभोग घेतला पण देखभाल दुरुस्तीवर काडीमात्र ही खर्च केला नाही.व पुढे दिवाळखोरीमूळे संस्थाच अवसानात गेल्याने त्यावरील संस्थेचे नियंत्रण सुटल्याने तसेच सहकार विभागाकडे दुरुस्ती साठी निधीची उपलब्धता नसल्याने देखभाल दुरुस्तीचा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे.पर्यायाने आधिच गलितगात्र झालेल्या गोदामाची अक्षरशः दुरवस्था झालेली आहे.
प्रदीर्घ कार्यवाहीचा तपशील
खोडाळा आदिवासी सेवा सहकारी संस्था अवसानात गेल्यामुळे सभासदांच्या सहयोगातून संपादीत केलेली स्थावर मालमत्ता नियमानुसार समान उद्देश असलेल्या संस्थेला हस्तांतरित करावी लागणार आहे.मात्र त्यासाठी पुष्कळ कागदी घोडे नाचवावे लागणार आहेत.सदरची कार्यवाहीत प्रदीर्घ अवधी लागणार आहे.सर्वप्रथम विविध कार्यकारी संस्थेकडून संस्थेचा ठराव जोडून हस्तांतरण मागणीचा प्रस्ताव संरक्षक (कस्टोडिअन) सहकार अधिकारी श्रेणी 1 तालुका मोखाडा यांना सादर करावा लागणार आहे.तेथूध तो जिल्हा निबंधक यांचेकडे व तेथून पुढे सहकार आयुक्त आणि त्यांचे कडून अंतिम मंजुरीसाठी सहकार मंत्रालयात सादर करावा लागणार आहे.त्या नंतरच अपेक्षित परिणाम समोर येणार आहे.
याबाबत खोडाळा आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेशी संपर्क साधला असता , संस्थेचा ठराव जोडून हस्तांतरण मागणीचा प्रस्ताव संरक्षक (कस्टोडिअन) सहकारी अधिकारी श्रेणी 1 मोखाडा यांना सादर करुन तातडीच्या कार्यवाहीसाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. -
गीता गवारी, चेअरमन-खोडाळा आदिवासी विविध, कार्यकारी संस्था, खोडाळा
याबाबत मोखाडा सहाय्यक निबंधक कार्यलयाशी संवाद साधला असता , खोडाळा आदिवासी विविध कार्यकारी संस्थेकडून सर्व कागदपत्रांच्या पूर्ततेसह प्रस्ताव सादर झाल्यानंतर तो जिल्हा निबंधक यांचेकडे पाठवला जाईल.मंजूरी उपरांत वरिष्ठांकडून प्राप्त होणाऱ्या मार्गदर्शक सुचनेनुसार हस्तांतरणाचा योग्य तो निर्णय घेण्यात येईल.
महेश भडांगे, सहाय्यक निबंधक - सहकार विभाग, मोखाडा.