

वाडा : तालुक्यात खानिवली येथील आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गाची मोठी फरपट सुरू असून निवास्थानांची दुर्दशा झाल्याने रुग्णालयातच विश्रांती करण्याची दुर्दैवी वेळ त्यांच्यावर येत आहे. एकीकडे शासन कोट्यवधींचा निधी अनाठायी खर्च करीत असताना आरोग्य सेवांबाबत इतके उदासीन का आहे असा सवाल विचारला जात आहे. खानिवली आरोग्य केंद्राजवळ असणाऱ्या जुन्या इमारतीचा रुग्णांच्या नातेवाईकांना धोका निर्माण झाला असून ही इमारत तातडीने निष्कासित करावी, अशी मागणी केली जात आहे.
खानिवली आरोग्य केंद्र जवळपास ४९ हजार लोकसंख्येला आरोग्य सेवा देत असून ८ उपकेंद्रांचा समावेश यात आहे. ३ वैद्यकीय अधिकारी, ४ परिचारिका, २ आरोग्य सहाय्यक, २ प्रयोगशाळा तंत्रज्ञान, १ औषध निर्माण अधिकारी, रुग्णवाहिका चालक, सफाई कामगार व २ शिपाई, अशी पदे येथे मंजूर आहेत.
कोणताही कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी या रुग्णालयाकडे फिरकण्यास तयार नसून या रुग्णालयात सुविधांची असणारी वानवा याला कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. रोज १०० हून अधिक बाह्यरुग्ण पावसाळ्यात २०० पार होतात मात्र येथील अधिकारी व कर्मचारी त्यांना सेवा देण्यात कसूर करीत नाहीत.
दिवसरात्र सेवेत असणाऱ्या या आरोग्य केंद्रावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्राम करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसून निवासस्थाने जीर्ण व धोकादायक बनल्याने अनेकदा दवाखान्यात आपले बस्तान मांडण्याची वेळ त्यांच्यावर येते. पावसाळ्यात तर परिस्थिती अधिक भीषण बनत असून विविध संस्थांच्या माध्यमातून अनेक सुधारणा येथे करण्यात आल्या आहेत.
अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना क्षणभर विश्रांती घ्यायला जागा नसूनही या रुग्णालयात कुटुंब नियोजन, विविध फाउंडेशन मार्गात तपासण्या, कर्करोग तपासणी व बाह्यरुग्ण तपासण्या अशा कामांवर त्याचा परिणाम होत नाही असे अधिकारी सांगतात.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाची तर अवस्था भयावह झाली असून अन्य कर्मचाऱ्यांची निवासस्थाने मोडकळीस आली आहेत. आरोग्य विभागाला या समस्यांची जाणीव का होत नाही असा सवाल विचारला जात असून कर्मचारी वर्ग मेटाकुटीला आला आहे. रुग्णालयाच्या बाजूला जुनी धोकादायक इमारत मृत्यूचा सापळा बनून उभी असून रुग्णांसह नातेवाईकांसाठी धास्ती वाढविणारी बाब आहे.
आरोग्य विभागाने तातडीने याबाबत दखल घेऊन अधिकारी व कर्मचारी निवासस्थान नवीन उभारावीत तसेच धोकादायक इमारत निष्कासित करावी अशी मागणी केली जात आहे. ग्रामपंचायत ब पंचायत समितीचे ठराव जोडून जुनी इमारत तोडण्याचा प्रस्ताव जिल्ह्याला पाठविला जाईल असे बांधकाम शाखा अभियंता विनायक चव्हाण यांनी सांगितले.
जूनी इमारत निष्कासित करण्यासाठी तातडीने मागणी करण्यात आली असून निवास्थानांचे देखील प्रस्ताव मंजूर झाले आहेत. लवकरच या आरोग्य केंद्रात कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने उभी राहतील.
डॉ. शरयू तुपकर, वाडा तालुका आरोग्य अधिकारी