

पालघर : पालघर तालुक्यातील मुरबे समुद्र किनारी प्रस्तावित जिंदाल बंदराच्या जनसुनावणीला सुरु असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जनसुनावणी दरम्यान नागरिकांनी आपली मते, निवेदने आणि अडचणी शांततेत तसेच कायद्याचे पालन करून मांडावी. कायदा व सुव्यवस्था भंग होईल असे वर्तन करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी केले आहे. दरम्यान मुरबे बंदर विरोधी संघर्ष समिती कडून जनसुनावणीला जोरदार विरोध केला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.
सोमवारी होणारी मुरबे बंदराची पर्यावरण विषयक जनसुनावणी पुढे ढकलण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समितीच्या वतीने जेएसडब्लू कंपनीच्या गेट समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. काळे झेंडे आणि बंदर विरोधी फलकांसह जमलेल्या आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. कंपनीच्या गेट समोर जिंदाल बंदराची प्रतिकात्मक होळी केली, त्यानंतर बोईसर पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिरीष पवार यांना निवेदन देण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. बंदर विरोधी संघर्ष समितीचे म्हणणे जाणून घेतल्यानंतर समितीचा मागणीला विरोध करीत जनसुनावणी बाबत ठाम असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जिंदाल बंदरासाठी पर्यावरण विषयक जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे. जनसुनावणीला मुरबे गावासह किनारपट्टीच्या गावांमधून विरोध केला जात आहे. चार हजारांपेक्षा अधिकच्या संखेने जनसमुदाय येणार असल्याची माहिती बंदर विरोधी संघर्ष समिती कडून देण्यात आली आहे.
प्रस्तावित मुरबे बंदराची जनसुनावणी पालघर जिल्हा क्रीडा संकुल परिसरात आयोजित करण्यात आली आहे. जनसुनावणीदरम्यान कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पालघर पोलीस दलामार्फत बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १२४ पोलीस अधिकारी, १०६९ पुरुष व महिला पोलीस अंमलदार, ८ स्ट्रायकिंग पथके, १ एसआरपीएफ (राज्य राखीव पोलीस दल), २ आरसीपी, २ जलद प्रतिसाद पथक यांचा समावेश आहे. तसेच वाहतूक नियंत्रणासाठी जिल्हा वाहतूक शाखेचे ३ अधिकारी व ३२ अंमलदार नेमण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनावर विश्वास ठेवून शांततेत जनसुनावणीत सहभाग घ्यावा आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यात पोलीस दलास सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक यतिश देशमुख यांनी केले आहे.
जनसुनावणी साठी मुरबे परिसरातुन चार ते पाच हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिशाभूल करणारा अहवाल तयार करण्यात आला आहे. आमच्या कडून विरोधाचे मुद्दे उपस्थित केले जातील. कोणत्याही परिस्थितीत बंदर होऊ देणार नाही.
प्रमोद आरेकर, अध्यक्ष, मुरबे बंदर विरोधी संघर्ष समिती.