

जव्हार : शेतकरी दाखला मिळवण्यासाठी पैशाची मागणी केल्याचा तसेच पैसे देण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ व अपमानास्पद वर्तन केल्याचा गंभीर आरोप जव्हार तहसील कार्यालयातील संबधीत सहाय्यक महसूल अधिकारी यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी न्याय मिळावा आणि संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी, या मागणीसाठी जामसर येथील ९० वर्षीय आदिवासी शेतकरी तुकाराम बाबुराव जाधव यांनी बुधवार,१८ नोव्हेंबर २०२६ पासून जव्हार तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
तुकाराम जाधव यांच्या तक्रारीनुसार, त्यांची बहीण अरुणा लक्ष्मण खेताडे यांच्या शेतकरी दाखल्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात आला होता. जामसर येथे त्यांच्या कुटुंबाची शेती असून अनेक वर्षांपासून ते शेती व्यवसाय करीत आहेत. मात्र, दाखला मिळण्यास विलंब होत असल्याने जाधव हे २८ सप्टेंबर २०२६ रोजी चौकशीसाठी तहसील कार्यालयात गेले होते. त्यावेळी संबधीत सहाय्यक महसूल अधिकार्यांनी कथितरीत्या २५ हजार रुपयांची मागणी केली.
पैसे देण्यास नकार दिल्यानंतर जातीवाचक शिवीगाळ करून अपमानित केले, तसेच धक्काबुक्की करून कार्यालयातून हाकलून देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. दरम्यान, जव्हार तालुक्यात शेतजमीन नसलेल्या काही व्यक्तींना शेतकरी असल्याचे बोगस दाखले देण्यात आल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यांची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी तुकाराम जाधव यांनी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी पालघर जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी जव्हार तसेच जव्हार पोलीस निरीक्षक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती. मात्र, निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करीत वयाच्या ९०व्या वर्षी न्यायासाठी त्यांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे.
एका ज्येष्ठ आदिवासी शेतकऱ्याला न्यायासाठी तहसील कार्यालयाच्या दारात बेमुदत उपोषणाला बसावे लागणे ही प्रशासनासाठी चिंतेची बाब आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आरोपांची सत्यता तपासावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. -
राजेश धात्रक जव्हार तालुका अध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया,