

खानिवडे : विरार पूर्वेकडील ग्रामीण भागातील जांभुळपाडा गाव परिसरात भरधाव वेगाने आलेली थार जीप घरासमोरील पत्र्याच्या शेडला व त्यामध्ये उभ्या असलेल्या दोन दुचाकींना धडक देत चक्क घराच्या व्हरांड्याला जोरदार धडकली. ही जीप घराच्या मुख्य दरवाजाच्या भिंतीवर आदळल्याने भिंत तसेच पूर्वेकडील भिंत व खिडकी खाली पडली. या घटनेत घराच्या हॉलमध्ये बसलेल्या कुटुंबातील घरमालक सुभाष सुतार यांच्या अंगावर पक्की भिंत पडल्याने घरमालक सुभाष जयराम सुतार (वय ५९) यांच्या डोक्याला व डाव्या हाताला दुखापत झाली.
ही घटना ५ ऑक्टोबर रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. मद्यधुंद अवस्थेतील थार चालकाने घराचे अश्याप्रकारे नुकसान केल्याने गावकऱ्यांनी मोठा संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणी चालकासह थार मधील एकाला पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.
सुभाष सुतार हे जांभुळपाडा येथेेे पत्नी सुवर्णा व मुलगा आकाश यांच्यासह राहतात. त्यांच्या घरासमोर भालीवली ते भाताणेच्या दिशेने जाणारा सिमेंटचा रस्ता असून, घराच्या मुख्य दरवाजासमोर पत्र्याचे शेड आहे. या शेडखाली त्यांच्या दोन दुचाकी उभ्या होत्या. रात्री ११.३० च्या दरम्यान थार जीप भाताणेच्या दिशेकडून भालीवलीकडे जात असताना आणि जांभुळपाडा हे एक खेडेगाव असल्याचे माहिती असताना मद्याच्या धुंदीत चालवून ती भरधावपणे थेट घरात घुसून हा अपघात घडला.
जीप थेट घरासमोरील पत्र्याच्या शेडमध्ये घुसली. त्यामुळे शेड उद्ध्वस्त होऊन दोन्ही दुचाकींना धडक बसली. त्यानंतर जीप घराच्या मुख्य दरवाजाच्या भिंतीवर आदळल्याने भिंत व खिडकी कोसळली. दरम्यान लाकडी माळा असलेले हे घर सुदैवाने बचावल्याने पुढील मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतर परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. व मदत कार्य करत पोलिसांना खबर दिली. एफआयआरमध्ये तक्रारदाराने चालक व त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीकडून दारूचा वास येत असल्याचा उल्लेख केला आहे.
या अपघातात दोघांनाही दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी चालकाची ओळख ही अंकीत मिश्रा (वय २६, नालासोपारा, पूर्व) अशी, तर त्याच्यासोबत असलेल्या व्यक्तीची ओळख ही राज यादव (वय २४) अशी नोंद केली आहे.
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...
अपघातात थारच्या पुढील भागाचे, बॉनेटचे तसेच पुढील व मागील काचेचेही नुकसान झाले असून एअरबॅग बाहेर आल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे. एका खेडेगावात अपेक्षित नसलेल्या या अपघातात घराचे नुकसान, दोन दुचाकींचे नुकसान आणि तक्रारदाराला झालेली दुखापत यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे. रहिवाशी यामुळे चिंता व्यक्त करत आहेत. याप्रकरणी मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल विकास थाकसेन मेहर यांच्याकडे पुढील तपास सोपविण्यात आला आहे. पोलिसांकडून अपघाताची पुढील चौकशी सुरू आहे.