

पालघर : हनिफ शेख
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागातील १११ कोटींचा निधी अनधिकृत रित्या काढण्याच्या प्रकारानंतर यातील दोषी आरोपीवर कारवाई झाली तर काही अधिकाऱ्यांचे निलंबन देखील झाले मात्र आता हे प्रकरण या ठिकाणी थांबत नसल्याचे चित्र असून या आधी सुद्धा अशी काही डिपॉझिट ची बिले काढण्यात आली का याचा तपास घ्यायला सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. तर यासाठी तब्बल २०१४ पासूनच्या डिपॉझिट बिलांची चौकशी होणार असल्याची माहिती आता समोर येत आहे. तर राज्यभर या बांधकाम विभागाची पोलखोल झाल्याने बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता राजभोज यांनी जव्हार कार्यालयाला भेट दिल्याचे देखील दिसून आले.
यामुळे आता १११ कोटींचे हे प्रकरण खरंतर शेवटचे असू शकते. मात्र याआधी गेल्या पाच ते दहा वर्षात अशी अनेक प्रकरणे घडल्याची शंका व्यक्त होत असल्याने तशी तपासणी देखील होणार आहे. यामुळे सध्या गाजत असलेले १११ प्रकरण हा कळस असला तर या प्रकरणाच्या पायथ्याशी नेमके काय मिळणार हे आता समोर येणार आहे. यामुळे काही ठेकेदारांचे चांगले धावे दणाणल्याचे देखील दिसून येत आहे.
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग हा त्याच्या चांगल्या कामाऐवजी भ्रष्ट कामासाठीच अधिक चर्चेत आला होता. यानंतर काही दिवसांपूर्वीच ठेकेदारांची कामापोटीची डिपॉझिटची बिले ती ही तब्बल १११ कोटी ६३ लाखांची काढण्याचा अयशस्वी प्रयत्न झाल्यानंतर हा विभाग चांगलाच चर्चेत आला. यामुळे या विभागाअंतर्गत काम करणाऱ्या ठेकेदारांचा कमी दिवसात वाढणारा आर्थिक स्तर पाहता यामध्ये नक्कीच मोठा भ्रष्टाचार होत असल्याचा एकूणच अंदाज आता लावण्यात येत आहे. अशी अनेक प्रकरणे घडल्यानंतरच गुन्हेगारांची एवढ्या मोठ्या पर्यंत मजल जाण्याची दाट शक्यता असल्याने आता मागील दहा वर्षापासून ची ही प्रक्रिया तपासली जाणार आहे.
याशिवाय मुख्य अभियंता यांनी या भेटीदरम्यान सर्व कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावल्याचे देखील सांगण्यात येत आहे बांधकाम विभागाची राज्यभर नाचक्की झाल्याने ज्यांना चांगले काम करायचे त्यांनी करा अन्यथा कोणाला बदली करायची असेल तर तीही करून देता येईल अशी तंबी देखील यावेळी त्यांनी दिल्याचे सूत्रांकडून कळत आहे. तर पालघर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किनी यांच्याकडे यावेळी जव्हार बांधकाम विभागाचा पदभार देखील देण्यात आला.
आता यापुढे कार्यालयातील ठेकेदारांचा थेट हस्तक्षेप बंद करून प्रत्येक कामाची फाईल ही अभियंत्याने किंवा बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनीच फिरवायची अशा देखील सूचना येथील अधिकारी कर्मचाऱ्यांना केल्याचे दिसून येत आहे.दरम्यान एकाच कामांची दोन एजन्सीवर बिले आणि काम न करता काढलेली विले याबाबत पुन्हा एक आरोप येथील कार्यालयावर झाला होता. तर चालू काम दाखवून जवळपास ९०% हून अधिक बिले काढण्याची एक प्रकरण चर्चेत आले होते मात्र या कामांच्या तपासणी करण्यासाठी दक्षता विभागाचे (व्हिजीलेंस) अधिकारी देखील जव्हार मधील काही कामे तपासणार असल्याचे देखील कळते आहे.