

पालघर : आयएस क्रेडरच्या कोकणातील प्रमुख अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांची पालघरच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. तर पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी मनोज रानडे यांची नियुक्ती झाली असून रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नेहा भोसले तर रत्नागिरीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी वैदेही रानडे यांची नियुक्ती झाली आहे.
डॉ. इंदुराणी जाखड यांनी गेली दोन वर्षे कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आयुक्त म्हणून सक्षमपणे काम केले आहे. त्यांना आता पालघर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तीन महिला अधिकाऱ्यांना कोकणच्या महत्वाच्या पदांवर नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी वैदेही रानडे आणि नेहा भोसले या दोन महिला अधिकारी यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत. तर पालघर जिल्हाधिकारी पदावरही डॉ. इंदूराणी जाखड या महिला अधिकारी रुजू झाल्या आहेत. मनोज रानडे आणि वैदेही रानडे यांची कोकण भवन येथून रत्नागिरी आणि पालघर येथे बदली झाली आहे.
रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांची पदोन्नतीने नागपूरमध्ये रोजगार हमी योजनेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली असून, त्यांच्या जागी नेहा भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाचे मुख्य सचिव (सेवा) व्हि. राधा यांनी सदर आदेश पारित केले आहेत. बुधवारी (दि. २) नेहा भोसले यांनी डॉ. भरत बास्टेवाड यांच्याकडून रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार स्वीकारला.
डॉ. भरत बास्टेवाड यांनी जुलै २०२३ मध्ये रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारली होती. डॉ. भरत बास्टेवाड शासनाच्या विविध योजना उत्तमरित्या राबविल्या. दिव्यांग व महिला बचत गटांना १०० टक्के अनुदानातून व्यवसायासाठी फिरते वाहन उपलब्ध करून देत, त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी केले तसेच प्रशासन गतिमान केले.
पालघर जिल्ह्याच्या विकासात्मक बाबीमध्ये विशेष लक्ष घालायचे असून हा विकास करत असताना जनसामान्यांच्या भावना व त्यांच्या समस्या सोडवण्याचे प्राधान्य असेल, असे पालघर जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी डॉक्टर इंदूराणी जाखड यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले. जिल्ह्यातील शिक्षण व आरोग्य सुदृढ बनवायचे असून आता उपलब्ध असलेल्या मनुष्यबळात जिल्ह्यातील जनतेला दर्जेदार सुविधा देण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष बागडे व अप्पर जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे आदी उपस्थित होते. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्त डॉ. जाखड यांची बदली मंगळवारी झाली. त्यानंतर बुधवारी त्या पालघर जिल्ह्याच्या सहाव्या नवनियुक्त जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाल्या. सध्याचे प्रभारी जिल्हाधिकारी व जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या कडून त्यांनी पदभार स्वीकारला. डॉक्टर इंदूराणी जाखड या २०१६ च्या बॅचच्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. त्यांनी गडचिरोली येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले असून रत्नागिरी जिल्ह्यात त्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी होत्या. महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये संचालक म्हणून त्यांनी काम केले आहे