

विक्रमगड; पुढारी वृत्तसेवा : विक्रमगड तालुक्यासह पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल असून विविध वनौषधी, रानभाज्या, फुले, वेली, जंगली फळे आढळतात. मात्र, असे असले तरी गेल्या काही वर्षांत भातशेती करण्यासाठी जंगलांचे प्रमाण कमी होऊ लागले आहे. त्यातच अनेक शेतकरी माळरानावरचे व शेताच्या बांधावरचे गवत मारण्यासाठी तणनाशकाचा वापर करू लागले आहेत. या फवारलेल्या तणनाशकाचा फटका नैसर्गिकरीत्या उगवणाऱ्या रानभाज्यांना बसत आहे. सध्याचे चित्र पाहिल्यास त्या नष्ट होण्याच्याच मार्गावर असून त्यांची चवही बिघडली आहे.
पावसाळा आला की, येथील नागरिकांना रानभाजीचे वेध लागतात. अंबाडी, बाफळी, कंटोली, कुर्डुची भाजी, रान केळफूल, सुरण, नालभाजी, कोळीभाजी, कोहरेल, टाकली, पेंढारी, शिंद, हिरवा माठ, काटेमाठ यांची चव आजही जुने लोक विसरलेले नाहीत. बहुतांश नवीन व शहरी पिढीला या रानभाज्या माहिती नाहीत; परंतु आजही जुन्याजाणत्या लोकांना रानभाजीची आठवण येतेच; पण शेतीवरील मजुरी खर्च कमी करण्याकरिता व मजुरांची वाढती टंचाई लक्षात घेत अनेक शेतकरी शेतात, माळरानावर, शेताच्या बांधावर तणनाशक , तसेच फवारतात.
पावसाळ्यात शेतात उगवणाऱ्या पौष्टिक व औषधी गुणधर्म असलेल्या रानभाज्यांचे बी तयार होण्याच्या आधीच तणनाशकाने मरून जातात. त्यामुळे त्या पुन्हा उगवत नाहीत त्यामुळे त्या नामशेष होऊ लागल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने या रान भाज्यांचे महत्व लक्षात घेऊन शेतकऱ्यांना तणनाशक फवारणीबाबत जनजागृती करून यापासून परावृत्त करायला पाहिजे अशी मागणी होत आहे.