

विक्रमगड ः सचिन भोईर
विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांचा रब्बी हंगामात गवार लागवडीकडे वाढता कल यंदा लक्षणीयरीत्या दिसून येतो आहे. मागील वर्षी गवार पिकाला मिळालेल्या चांगल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी या वर्षी गवार लागवडीकडे मोठ्या प्रमाणावर वळताना दिसत आहेत. कमी खर्च, स्थिर बाजारपेठ आणि जलद उत्पादन या वैशिष्ट्यांमुळे गवार शेती तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर पर्याय ठरू लागली आहे.
गवार लागवडीच्या वाढीमागे आर्थिक कारणांबरोबरच नैसर्गिक घटकांचाही महत्त्वाचा वाटा आहे. या भागात कमी पाण्यात चांगले वाढणारे गवार पीक मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरत आहे. विक्रमगड तालुक्यातील मातीची रचना आणि येथे उपलब्ध वातावरणीय परिस्थिती गवार पिकासाठी अनुकूल असल्याने मागील काही वर्षांपासून या पिकाचे क्षेत्र सातत्याने वाढत चालले आहे.
परंपरागत पिकांच्या तुलनेत कमी जोखमीचे आणि चांगले दर देणारे हे पीक शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्याचे साधन ठरत आहे. विशेष म्हणजे, येथे पिकवले जाणारे गवार हे कमीत कमी रासायनिक खतांचा वापर करून तयार केले जाते. यामुळे त्याची चव आणि गुणवत्ता उच्च दर्जाची राहते. याच कारणामुळे विक्रमगड तालुक्यात पिकणाऱ्या गवारला केवळ कल्याण आणि मुंबई येथील बाजारपेठेतच नव्हे, तर गुजरात राज्यामधूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. व्यापाऱ्यांच्या मते, विक्रमगड परिसरातील गवारची वेगळी चव आणि दर्जा यामुळे त्याला विशेष पसंती लाभत आहे.
गवारसह इतर भाजीपाला लागवडीतील वाढीचा लाभ विक्रमगड तालुक्यातील रोजगारस्थितीलाही मिळू लागला आहे. लागवड, तणनियंत्रण, तोडणी, वर्गीकरण आणि वाहतूक या सर्व टप्प्यांमध्ये भरपूर मजुरांची गरज असल्याने स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होत आहे. ही रोजगारनिर्मिती आदिवासी बहुल विक्रमगड तालुक्यातील स्थलांतर रोखण्यास महत्त्वाची ठरत आहे. पूर्वी रोजगाराच्या शोधात बाहेर जाणारे अनेक मजूर आता गावीच भाजीपाला शेती करू लागल्याने स्थानिक पातळीवरच स्थिर झाले आहेत.
कृषी विभागाच्या माहितीनुसार, गवार लागवडीचे वाढते क्षेत्र, भाजीपल्याला मिळत असलेला चांगला भाव, आणि भाजीपाला उत्पादकतेतून निर्माण झालेला रोजगार या सर्व घटकांमुळे तालुक्यातील ग्रामीण रोजगार निर्मितीला नवे बळ मिळत आहे. शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढत असून, विक्रमगड तालुका कृषी उत्पादनाबाबत हळूहळू प्रगतीच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मागील वर्षी गवारीने चांगलाच भाव खाल्ला होता. हा भाव 150 ते 200 रुपये किलो पर्यंत गेला होता. त्यामुळे या वर्षी विक्रमगड तालुक्यातील गवार लागवडीचे क्षेत्र दुप्पटीने वाढणार आहे.
मागील तीन वर्षांपूर्वी आम्ही पूर्ण कुटुंब वितभट्टीवर कामाला जायचो. मात्र तीन वर्षांपासून आम्ही गवार लागडवड करू लागलो आणि त्यातून चांगला नफा मिळायला लागला. त्यामुळे आम्ही पूर्ण कुटुंब वितभट्टीवर न जाता गवार लागवड करू लागलो आहोत. मागील वर्षी भाव चांगला मिळाल्यामुळे या वर्षी आम्ही जास्त प्रमाणात गवार लावली आहे.
रामू घाटाळ, शेतकरी