

Salwad Shivajinagar gas leak
बोईसर : तारापूर एमआयडीसीतील प्लॉट क्र. T-150 वरील आरती ड्रग्ज लिमिटेड या कंपनीमध्ये विरळ हायड्रोक्लोरिक अॅसिड (HCl) साठवणुकीच्या टाकीला भेग पडल्याने आम्ल गळती झाली. या गळतीमुळे दाट धुरकट वायू पसरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.
सालवड व शिवाजीनगर परिसरातील नागरिकांसह कंपनीतील काही कामगारांच्या डोळ्यांत व घशात चुरचुर, जळजळ होण्याच्या तक्रारी पुढे आल्या. अचानक निर्माण झालेल्या या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, कंपनी प्रशासनाने तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली असून मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती मिळताच प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच पोलिस यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.या घटनेमुळे पुन्हा एकदा एमआयडीसी परिसरातील रासायनिक उद्योगांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.