

वाडा (पालघर): मच्छिंद्र आगिवले
गणेशोत्सव अगदीच दोन दिवसांवर आला असून मूर्तिकार, डेकोरेशन यासह उत्सवात सहभागी होणार्या अनेक प्रकारच्या कलाकारांची लगबग सुरू झाली आहे. वाडा शहरात पंढरपूर येथून वाद्य दुरुस्ती करायला करणार्या कलाकारांना खास पसंती लाभत असून 40 दिवसांच्या या व्यवसायात शेकडो वाद्य ते दुरुस्त तसेच नवीन बनवून देत आहेत.
गणपती म्हटलं की आनंदीआनंद व सर्वत्र जयजयकार ऐकू येतो, यात वाद्यांची भूमिका महत्त्वाची असून हीच वाद्य दुरुस्तीची सध्या मोठी लगबग सुरू आहे. पंढरपूर येथून वाड्यात आलेले गणेश जाधव व सूरज जाधव हे आपला वडिलोपार्जित वाद्य दुरुस्तीचा व्यवसाय सांभाळीत असून अवघ्या 28 वर्षांच्या गणेश याला वाद्यांची मोठी आवड व माहिती आहे. तबला, पकवाद, ढोलकी, हार्मोनियम , ढोलताशे अशी अनेक वाद्य हे बंधू दुरुस्त करून देतात तसेच त्यांनी दिलेली नवीन वाद्य तितकीच सुरेल असल्याचे ग्राहक सांगतात.
भजनी मंडळ, गणपतीसाठी लागणारी वाद्य तसेच अनेकांनी आवड म्हणून बाळगलेल्या विविध वाद्यांची कमी वापर व दुरुस्ती अभावी अनेकदा दुर्दशा होते. पुडा बदलणे, शाई भरणे, ढोलकीतील मेन बदलणे, वादी बदलणे अशी अनेक दुरुस्तीची कामे हे बंधू मोठ्या निपुणतेने करतात. पंढरपूर येथे त्यांचे मोठे दुकान असले तरी मागील चार वर्षांपासून ते वाडा येथे 40 दिवसांच्या मुक्कामाला येऊन जवळपास 500 वाद्यांची दुरुस्ती व विक्री ते करतात.
वाद्य दुरुस्तीसाठी कोणतेही यंत्र विकसित नसून सर्व कामे हाताने व मोठ्या कौशल्याने करावी लागतात आणि म्हणूनच पुढची पिढी हे काम करील याची शाश्वती नाही असे जाधव सांगतात. वाद्यांची उत्तम पद्धतीने दुरुस्ती करणे ही अतिशय वेळखाऊ प्रक्रिया असून 2012 पासून गणेश व त्याच्या भावाने आपल्या तिसर्या पिढीकडून आलेला वारसा जपला आहे. शहापूर व भिवंडी अशा ठिकाणी आम्ही वाद्यांची अनेकदा दुरुस्ती करून घेतो मात्र पंढरपूरहून आलेल्या या कलाकारांच्या हाती मोठी कसब असून वर्षानुवर्षे वाद्य दुरुस्ती करावी लागत नाहीत असे सासणे गावातील विश्वनाथ पाटील यांनी सांगितले.