

पालघर : हनिफ शेख
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जस जशा जवळ येत आहेत तस तशा पालघर जिल्ह्यातील राजकारणात मोठ्या राजकीय उलाढाली व्हायला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश निकम यांच्यासह जव्हार विक्रमगड पालघर तालुक्यातील अनेक एकनाथ शिंदे यांच्या शिवसैनिकांनी भाजपचा झेंडा धरल्याचे दिसून आले. अगदी काही महिन्यांपूर्वीच जिजाऊ संघटनेचे सर्वेसर्वा निलेश सांबरे यांना शिवसेनेत घेऊन पालघरसह कोकणामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद वाढवण्यासंदर्भात राजकीय घडामोडी केल्याचे बोलले जात होते.
पालघर जिल्ह्यात मात्र याचा काहीसा उलटा परिणाम तर झाला नाही ना असं बोललं जात आहे त्याचे कारणही स्पष्ट आहे प्रकाश निकम यांनी पक्ष सोडताना थेट निलेश सांबरे यांना पक्षात घेतल्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्ता म्हणून मी आणि माझे समर्थक काम करू शकणार नव्हतो म्हणून आम्ही भाजपमध्ये प्रवेश करीत असल्याचे जाहीर सांगितले यामुळे शिवसेनेत निलेश सांबरे इन तर प्रकाश निकम आउट झाल्याचे दिसून येत आहे .
याच वेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी प्रवेशा आधीच महायुती न करता सर्वांनी स्वबळावर लढावं असे माझे मत असल्याचे सांगितले त्यामुळे विरोधी पक्षाप्रमाणेच महायुतीतील प्रमुख घटक असलेल्या शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकार्यांना भाजपने आपल्याकडे घेतले आहे. निलेश सांबरे यांची जिजाऊ संघटना कोकणात काम करते यामुळे सांबरे यांना घेतल्याने शिवसेनेची ताकद वाढेल यासाठी मंत्री उदय सामंत आणि उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत त्यांचा जाहीर प्रवेश झाला यावेळी त्यांच्या हजारो समर्थकांनी सुद्धा शिवसेनेत प्रवेश केला.
अशातच मी बंडखोरी करून सांबरे यांच्या पक्षातून लढलो मात्र त्यांनी मला धोका दिला त्याच सांबरेना घेतल्याने मी पक्ष सोडत आहेत असे सांगत पक्षाचा जिल्ह्यातील आदिवासी चेहरा प्रकाश निकम यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.
महायुतीतील वादाचा महाविकास आघाडीला फायदा?
पालकमंत्री नाईक यांचे लॉटरीचे वाक्य असो की नाईक यांच्या जनता दरबाराला पर्याय म्हणून प्रताप सरनाईक यांनी पालघर जिल्ह्यात भरवलेला लोक दरबार असो आणि आता भाजपकडून शिवसेनेचे फोडलेले प्रमुख पदाधिकारी लोकप्रतिनिधी असो महायुतीत नक्कीच काही अलेबल नसल्याची ही काही उदाहरणे आहेत. यामुळे दोन्ही पक्ष आणि तिसरा राष्ट्रवादी अजित पवार गट हे स्वतंत्र लढतील असेच काहीही चित्र आज तरी दिसत आहे.
दुसरीकडे जिल्ह्यातील महाविकास आघाडीची ताकद कमी झाली असली तरी एकी मात्र अद्याप पर्यंत आहे यामुळे महायुतीतील या वादाचा महाविकास आघाडी फायदा उचलले की नाही हे येणारा काळ ठरवणार आहे यामुळे आगामी निवडणुकीत पालघर जिल्ह्यातील राजकीय घडामोडी आणि निवडणुका सर्वात जास्त मनोरंजक असतील हे नक्की.
आदरणीय शिंदे साहेबांमुळे ही महायुती मजबूत झाली पुन्हा सत्तेत आली अशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी भाजपमध्ये घेणे म्हणजे महायुतीत मिठाचा खडा टाकण्यासारखे आहे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी याबाबत खरंतर काळजी घ्यायला हवी होती मात्र तसे झाले नाही. याची दखल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नक्कीच घेतील मात्र आता भाजपमधील असंतुष्ट पदाधिकारी आमच्याकडे घेण्यासंदर्भातला मार्ग मोकळा झाला आहे.