

पालघर : राज्यामध्ये 61 दिवसाची मासेमारी बंदी कालावधी पाळला जात असून पश्चिम किनार्यावरील केरळ, कर्नाटक व गुजरात या राज्याच्या बंदी कालावधीशी एकरूप रहावे या दृष्टिकोनातून काही वर्षांपूर्वी हा मासेमारी बंदीबाबत समान कालावधी ठेवण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता.
गेल्या वर्षी वादळी वातावरण तसेच मच्छीमारांची आवक वाढावी या दृष्टिकोनातून पालघर व ठाणे जिल्ह्यातील मच्छीमारांनी स्वयंस्फूर्तीने 15 ऑगस्ट नंतर मासेमारी हंगाम सुरू करण्याचा एकत्रित निर्णय घेतला होता. त्याचा लाभ झाल्याचे दिसून आले होते. यंदाच्या वर्षी गुजरात राज्याने 15 ऑगस्ट पर्यंत मासेमारी बंदी कालावधी वाढविला असून त्याचे अनुकरण महाराष्ट्र राज्याने करावे अशी मागणी मच्छीमारांकडून केली जात आहे.
सरंगा माशाचे प्रजनन डिसेंबर महिन्यापूर्वी होत असून मासेमारी हंगाम मे महिन्यात संपण्यापूर्वी हा मासा 100 ग्रॅम पेक्षा कमी वजनाचा असतो. एप्रिल व मे महिन्याच्या कालावधीत अशा लहान आकाराच्या माशाची मोठ्या प्रमाणात पकड होत असल्याने त्याचा परिणाम पुढील हंगामाच्या पापलेट उत्पादनावर होत असल्याचे दिसून आले आहे. राज्य सरकारने 135 मिलिमीटर पेक्षा कमी लांबीच्या पापलेट मासाच्यामासेमारीवर बंदी आणली आहे.
या पार्श्वभूमीवर एप्रिल व मे महिन्यात होणारे मासे उत्पादनाच्या वेळी माशांच्या आकारमानाचे काटेकोरपणे तपासणी करून मासेमारी बंदी कालावधी 15 मे पासून अमलात आणावा अशी भूमिका मत्स्य व्यवसाय विभागाचे निवृत्त सहाय्यक संचालक तसेच सातपाटी मच्छीमार विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे विद्यमान चेअरमन विनोद नाईक यांनी मांडली आहे. मासेमारी बंदी कालावधी वाढवल्यास त्याचा लाभ मच्छीमाराला निश्चित मिळेल. तसेच राज्य माशाच्या संवर्धनासाठी ते उपयुक्त ठरेल अशी भूमिका त्यांनी बोलताना व्यक्त केली.
एकूणच काय तर राज्यमासाचे संवर्धन व्हावे त्याचे वजन व आकारमान वाढावे या दृष्टीने मत्स्य व्यवसाय विभागाने विविध मच्छीमार सहकारी संस्थांच्या बैठका घेऊन लहान आकाराच्या पापलेट माशाची पकड करू नये, यासाठी असलेली कायदेशीर तरतूद, त्याचे महत्त्व व जागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच बरोबरीने उत्तन, वसई, एडवण, सातपाटी व डहाणू किनारावर असणार्या परवाना अधिकारी यांच्यामार्फत आवक होणार्या पापलेट माशाचे आकारमान तपासले जात असल्याची माहिती दिनेश पाटील यांनी दिली. नवीन मासेमारी हंगामात प्राप्त झालेल्या पापलेट माशाचे आकारमान समाधानकारक असल्याचे दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.