

पालघरः पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या पालघर जिल्ह्यातील १८ आदिवासी कुटुंबीयांना त्यांचा प्रलंबित मच्छीमारांच्या असलेला निधी तातडीने देण्यात यावा अशी मागणी शांततावादी कार्यकर्ते जतिन देसाई यांनी पालघर जिल्हाधिकारी निवेदनाद्वारे केली आहे.
कुटुंबावर उपासमारीची वेळ
पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आदिवासी बांधव गुजरात राज्यात मासेमारी बोटीवर कामासाठी जातात यावेळी पाकिस्तानच्या सीमेमध्ये चुकून मासेमारी करताना या मच्छीमारी नोका सीमा ओलांडून पाकिस्तानी सैनिकांच्या तावडीत सापडल्यावर त्यांची रवानगी तिथल्या तुरुंगात होते. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ येते गेले तीन ते चार वर्ष हे आदिवासी पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत त्यांची शिक्षा बऱ्याच आधी पूर्ण झाली आहे व त्यांचे राष्ट्रीयत्व सुद्धा भारत सरकारने स्पष्ट केले आहे. ते लवकरात लवकर सुटून त्यांच्या घरी परत येतील यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे अशी विनंती ही देसाई यांनी केली आहे ते पाकिस्तानच्या अटकेत असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
प्रती दिन तीनशे रुपये कुटुंबाला देण्याचा शासनाचा निर्णय
मासेमारी करताना पकडल्या गेलेल्या मच्छीमारांना गुजरात राज्य ज्या दिवशी मच्छीमार पकडला गेला त्या दिवसापासून प्रतिदिन तीनशे रुपये त्यांच्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी देत असते गुजरात प्रमाणे महाराष्ट्र शासनाने सुद्धा मच्छीमार जेवढे दिवस पाकिस्तानच्या तुरुंगात असतील तेवढे दिवस प्रति दिन तीनशे रुपये त्यांच्या कुटुंबाला देण्याचा निर्णय २ ऑगस्ट २०२३ च्या शासन निर्णयामार्फत घेण्यात आला आहे. त्या आदेशात काही त्रुटी असल्या तरी सरकारने जून व जुलै महिन्यात १६.२० लाख रुपयांचा पहिला हप्ता त्यांचा कुटुंबीयांना दिला. मे महिन्यापर्यंत ही रक्कम अधिक होत होती. मे पर्यंतचे ५१.२६ लाख रुपये व आतापर्यंतची अधिक रक्कम तात्काळ देण्यात यावी व गुजरात प्रमाणे त्यांना दर महिन्याला ही मदत मिळाली पाहिजे तसेच अटकेतील सर्व आदिवासी असल्याने त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी अशी ही मागणी देसाई यांनी केली आहे.