

मुंबईः राज्यातील मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडा भागात पूरस्थिती निर्माण होऊन मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी मत्स्योद्योग मंत्री नीतेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. संबंधित अधिकार्यांना सर्वेक्षण करून नुकसानीची नोंद करण्याचे आदेश देण्यात आले. तसेच राज्यातील सर्व तलावांचे सर्वेक्षण करून गाळ किती साचला आहे, याची माहिती सादर करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
गाळ काढण्याचा कार्यक्रम पुढील काही दिवसांत राबवण्याचे प्रयत्न सुरू असून, पुढील वर्षी पुन्हा गाळ साचल्याने तलाव ओव्हरफ्लो होण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी उपाययोजना करण्यात येणार असल्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नीतेश राणे यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन. रामास्वामी, मत्स्य आयुक्त किशोर तावडे यांसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.