वाडा : पालघर जिल्ह्यातील वाडा, विक्रमगड व जव्हार तालुक्यासह अन्य भागातून उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या जात असून यासाठी मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. शेकडो शेतकरी यामुळे बाधित होणार असून नुकसान भरपाईची कुठलीही ठोस तरतूद होत नसल्याने वाडा प्रांत कार्यालयासमोर धर्मवीर विचार मंचाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे बिहाड आंदोलन सुरू आहे. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून आमदार दौलत दरोडा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र देऊन प्रशासन आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याने नाराजी व्यक्त केली आहे.
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून विविध नामांकित कंपन्यांच्या विद्युत वाहिन्या जात असून दोन वर्षांपासून यासाठी जागोजागी मनोरे उभारण्याचे काम सुरू आहे. मनोरे जरी उभारले जात असले तरी ज्यांच्या जागेतून हे मनोरे व वाहिन्या जाणार आहेत अशा शेतकऱ्यांना मात्र विश्वासात घेण्यात आले नाही असे आंदोलकांचे म्हणणे आहे. विविध तालुक्यांमध्ये नुकसान भरपाईची रक्कम भिन्न असून एक जिल्हा एक भाव या मागणीसाठी जवळपास ३०० ते ४०० शेतकऱ्यांचे बुधवारपासून बिन्हाड आंदोलन सुरू आहे.
रोजगार भत्ता देण्याची मागणी
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीही शेतकऱ्यांमध्ये उत्साह कायम असून प्रशासन मात्र शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे कानाडोळा करीत आहे असा आरोप केला जात आहे. शहापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार दौलत दरोडा यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासन आंदोलकांकडे जाणीवपूर्वक का दुर्लक्ष करीत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तातडीने याबाबत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यावेत असे पत्र दिल्याने आंदोलनाला अधिक बळ आल्याचे पीडित शेतकऱ्यांनी सांगितले. आंदोलनामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून आंदोलनाच्या दिवसापासून रोजगार भत्ता द्यावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.