

पालघर : फक्त झेंडा लावण्यासाठी नाही तर नागरीकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी नगरपरिषद हवी आहे. येत्या काळात पालघर नगरपरिषदेचे महापालिकेत रूपांतर करावे लागणार आहे. वाढत्त्या पालघर शहरात सोयी सुविधा हव्यात, शहरांना सूज असू नये, त्यामुळे नियोजन बद्ध पालघर तयार करण्यासाठी विकासाच्या आराखड्यावर काम करणारा व्यक्ती नगराध्यक्ष झाला पाहिजे. अन्य कुणी नगराध्यक्ष पदावर निवडून आल्यानंतर कितीही पैसा दिला तर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचणार नाही. सकारात्मक दृष्टिकोनातून मत देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. तुम्ही मतदान करून भाजपच्या उमेदवारांना निवडून द्या, पुढीलप्रमाणे पाच वर्षे तुमची चिंता आम्ही करू, असे आश्वासन दिले.
पालघर नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी बुधवार दुपारी पालघरच्या मिश्रा मैदानात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा पार पडली. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, राजन नाईक, स्नेहा दुवे-पंडित, हरिश्चंद्र भोये, ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.
कुणावर टीका न करत पॉझिटिव्ह बोलणार आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या आशा आकांक्षाना बळ देण्याची गरज आहे. शहरांना अभिशाप न मानता संधी मानण्या सह शहरामध्ये चांगल्या सुविधा निर्माण करण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश आहे. अटल अमृत मिशन अंतर्गत शहरांच्या विकासासाठी लाखो कोटी रुपये दिले आहेत.
शहरांत भुयारी गटारे आणि सांडपाण्यावर प्रक्रिया तसेच नदी नाल्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी योजना राबवल्या जातील. दवाखाने, शाळा तयार करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जात आहे. शहरे बदलण्याची कामे सुरु आहेत. येत्या काळात खूप कामे करायचे आहे. कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांचे जीवनमान उच्च स्तरावर न्यायचे आहे.
वाढवण बंदरामुळे दहा लाख रोजगार निर्मिती होणार
पालघर देशात सर्वात वेगाने विकसित होणारा जिल्हा आहे. वेगवेगळ्या प्रकारची विकासाची कामे जिल्ह्यात सुरु आहेत. विकास कामे सुरु असताना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न केले जात आहे. एक लाख कोटी रुपये खर्चुन पालघर मध्ये वाढवण बंदर तयार करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला. बंदरामुळे मासेमारांच्या रोजगारावर गदा येता काम नये यासाठी राज्य सरकारकडून अटी टाकून मासेमारांचे प्रोटेक्शन करण्यात आले आहे. मासेमारी व्यवसाय टिकवण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक मासेमारीसाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. वाढवण बंदरामुळे दहा लाख रोजगार निर्मिती होणार असताना आधी भूमिपुत्रांना रोजगार मग इतरांचा विचार केला जाणार आहे.
पालघरमध्ये ऑफशोर एअरपोर्ट उभारला जाणार
पालघर जिल्ह्यातील तरुणांमध्ये कौशल्य निर्माण करण्यासाठी ५६ कंपन्यांसोबत करार करण्यात आले आहेत. तीन ते चार वर्षात बंदर तयार होत असताना प्रशिक्षित तरुणांना रोजगारही मिळेल. पालघरमध्ये ऑफशोर एअरपोर्ट उभारला जाणार आहे. कोस्टल रोड डहाणू पर्यंत आणला जाणार आहे. येत्या काळात पालघर मध्ये चौथी मुंबई तयार केली जाणार आहे. जल जमीन जंगल वैविद्याला बाधा न पोहोचवता पालघरच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. वनविभागाच्या माध्यमातून पालघर मध्ये २०० एकर क्षेत्रात वनउद्यात उभारणी केली जात असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
लाडक्या बहिणीला लखपती दीदी करायचे आहे
आम्ही जे बोलतो तो करतो, देवा भाऊ लाडकी बहीण योजना कधीही बंद होऊ देणार नाही, लाडक्या बहिणीला लखपती दीदी करायचे आहे. आपल्या विचार आणि आपले कार्यक्रम राबवणारी लोकं हवेत. अतिक्रमणे नियमित करायची आहेत, बेघर असलेल्यांना पक्की घरं द्यायची आहेत. कोणावर टीका किंवा उत्तर देण्यासाठी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा संदेश घेऊन पालघर मध्ये आलो आहे. २०१४ पूर्वी पालघर जिल्ह्याची अवस्था काय होती? जिल्हा मुख्यालय नव्हते, रस्ते नव्हते. मुख्यमंत्री असताना निर्णय घेऊन सिडकोच्या माध्यमातून डिझाईन तयार करून सर्वात उत्तम अशी मुख्यालयाची इमारत पालघरमध्ये बांधली, सतत जिल्ह्याला आकार देण्याचा प्रयत्न केला. काम करण्यापेक्षा स्थगितीमध्ये रस असलेल्या पक्षातून कंटाळून कैलास म्हात्रे काम करणाऱ्या पक्षात आल्याचे सांगत ठाकरेंच्या सेनेवर टीका केली.