

वाडा : वाडा तालुक्यातील लाखों रुग्णांना आरोग्य सेवा देणाऱ्या ग्रामीण रुग्णालयाची अवस्था आधीच अत्यंत दयनीय असून रुग्णांना अनेकदा जीव धोक्यात घालून शहराकडे उपचारांसाठी जावे लागते. हे थोडे की काय रुग्णालयात अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याची प्रचंड गैरसोय असून रुग्ण सेवेसोबत मूलभूत सुविधांसाठी रुग्ण तसेच नातेवाईकांना चटके सहन करावे लागत आहेत. बाटलीबंद पाण्याने नाहक कंबरमोड होत असून बकाल स्वच्छतागृहांमुळे आरोग्य आणखी धोक्यात आले आहे असे रुग्णांचे नातेवाईक सांगतात.
३० बेड रुग्णक्षमता असलेल्या वाडा ग्रामीण रुग्णालयाचे उप जिल्हा रुग्णालयात रूपांतर होऊन तीन वर्षे झाले, मात्र अजूनही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. रुग्णांना यामुळे आरोग्य सेवांसाठी तडजोड करावी लागत आहेच मात्र आता पिण्याच्या पाण्याची देखील साधी व्यवस्था रुग्णालय प्रशासन करू न शकल्याने संतापाची लाट उसळली आहे.
दानशूर लोकांनी फिल्टर उपलब्ध करून दिली आहेत. नगरपंचायत विभागाचे मोफत पाणी स्टँड दवाखान्यात असून ते शोभा वाढविण्यासाठी उभा आहे का असा सवाल विचारला जात आहे. वैद्यकीय अधीक्षकांना विचारणा केली असता कर्मचारी पाणी बंद करीत असावेत असे सांगून भोंगळ कारभारावर शिक्कामोर्तब केली आहे.