Dahanu House Fire : दिवाळ सणातच आगीत घर जमीनदोस्त

डहाणू भीमबांध परिसरातील घटना,धनधान्यही आगीच्या भक्ष्यस्थानी
Dahanu House Fire
Dahanu House Firepudhari photo
Published on: 
Updated on: 

कासा : दिवाळीचा सण म्हणजे आनंद, उत्साह आणि प्रकाशाचा सण! मात्र, याच सणाच्या काळात डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील भीमबांध परिसरातील एका आदिवासी कुटुंबाच्या आयुष्यात अंधार पसरला आहे. बुधवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास जानकी बसवत यांच्या घराला अचानक भीषण आग लागली.

या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले असून घरातील अन्नधान्य, कपडे, भांडी तसेच दैनंदिन वापरातील सर्व संसारोपयोगी साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. या दुर्घटनेत कुटुंबाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून आता या कुटुंबावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

दिवाळीनिमित्त सर्वत्र घराघरांत दिव्यांची रोषणाई, फराळाची लगबग आणि आनंदाचे वातावरण असताना वाघाडीच्या भीमबांध परिसरात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. दुपारच्या सुमारास जानकी बसवत यांच्या घरातून अचानक आग लागल्याचे निदर्शनास आले. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. घरातून आगीच्या मोठमोठ्या ज्वाळा आणि धुराचे लोट बाहेर पडू लागल्याने परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

Dahanu House Fire
Kasadi River Pollution : कासाडी नदीच्या प्रदुषणाने मत्‍स्‍यजीवन धोक्यात

ग्रामस्थांनी उपलब्ध साधनसामग्रीच्या मदतीने आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीची तीव्रता अधिक असल्याने काही वेळातच संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडले. घरातील साहित्य बाहेर काढण्याची संधीही मिळाली नाही. त्यामुळे धान्य, कपडे, भांडी आणि कष्टाने उभा केलेला संसार क्षणार्धात राखेत बदलला. सुदैवाने आग लागली त्यावेळी घरात कुटुंबातील कोणतीही व्यक्ती उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली.

घटनेची माहिती मिळताच डहाणू अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, वाघाडी हे डहाणूपासून सुमारे २५ ते ३० किलोमीटर अंतरावर असल्याने अग्निशमन दलाच्या वाहनाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी एक तासाहून अधिक वेळ लागला. तोपर्यंत आगीने संपूर्ण घर आणि घरातील साहित्य जाळून टाकले होते.

अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचेपर्यंत घराची मोठ्या प्रमाणात राखरांगोळी झाली होती. ग्रामस्थांनी केलेल्या प्रयत्नांनंतर आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. मात्र, तोपर्यंत बसवत कुटुंबाच्या हातात उरला होता तो केवळ जळालेल्या घराचा ढिगारा. जानकी बसवत यांच्या कुटुंबाने मोठ्या कष्टाने उभा केलेला संसार या आगीत पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे.

घरातील अन्नधान्य जळून गेल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, तर कपडे, भांडी आणि जीवनावश्यक वस्तू नष्ट झाल्याने दैनंदिन जीवन जगणेही कठीण झाले आहे. या आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Dahanu House Fire
Raigad Illegal Hill Mining : नव्या गौण खनिज उत्‍खनामुळे सह्याद्रीचे अस्‍तित्‍व धोक्यात

शासनाच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या तरतुदींनुसार नुकसानग्रस्त कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मंजूर करावी. तसेच तात्पुरता निवारा, अन्नधान्य, कपडे, भांडी आणि इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.