Dahanu Virar railway services : डहाणू-विरार रेल्वे प्रवाशांच्या मागण्यांसाठी रेल्वे प्रशासनाशी चर्चा

१५ डब्यांच्या लोकल, अतिरिक्त सेवा, घोलवडपर्यंत सेवा वाढविण्याची मागणी
Dahanu Virar railway services
Dahanu Virar railway servicespudhari photo
Published on
Updated on

सफाळे : डहाणू- विरार उपनगरीय रेल्वे मार्गावरील वाढती प्रवासी संख्या, लोकलमधील प्रचंड गर्दी आणि प्रवाशांच्या विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचे सहसचिव व उपनगरीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य ॲड. प्रथमेश प्रभुतेंडोलकर यांनी रेल्वे अभ्यासक विराग म्हात्रे व हिमांशू वर्तक यांच्या समवेत मुंबई सेंट्रल विभागाच्या वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापकांची भेट घेऊन प्रवासी समस्यांवर सविस्तर चर्चा केली.

यावेळी डहाणू- विरार मार्गावरील प्रवाशांच्या विविध मागण्यांचे निवेदन रेल्वे प्रशासनाला सादर करण्यात आले. सकाळच्या ९३००२ व ९३००४ डहाणू रोड–चर्चगेट लोकल १५ डब्यांच्या करण्याची मागणी करण्यात आली. तसेच सायंकाळी सुमारे ५.४५ वाजता डहाणू रोडहून चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलची प्रवासी क्षमता वाढविण्याची मागणी करण्यात आली.

Dahanu Virar railway services
Ganesh idol prices Wada : सजावट, इमिटेशन ज्वेलरीने गणेशमूर्ती महागल्या

१५ डब्यांची सेवा तत्काळ शक्य नसल्यास पहाटे ४.१० ते ४.२० दरम्यान डहाणू रोडहून अतिरिक्त लोकल सुरू करण्याचा पर्यायही सुचविण्यात आला. दादर-विरार ९०६६७ व विरार- डहाणू रोड ९३०३३ या सेवांचे एकत्रीकरण करून दादर ते डहाणू रोड अशी सलग लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

या सेवेचा १५ डब्यांचा पर्यायही तपासण्याची मागणी करण्यात आली. डहाणू रोड परिसरातील प्रवाशांसाठी रात्रीची रेल्वे कनेक्टिव्हिटी वाढविण्याच्या दृष्टीने रात्री ११ वाजल्यानंतर चर्चगेटहून डहाणू रोडकडे अतिरिक्त लोकल सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यामुळे रात्री उशिरा कामावरून परतणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

उमरोळी स्थानकावर ६९१७३/६९१७४ मेमूला नियमित व्यावसायिक थांबा देण्याची मागणीही करण्यात आली. तसेच ही मेमू सेवा घोलवडपर्यंत वाढविण्याची मागणी करण्यात आली असून, त्याचा घोलवड व परिसरातील ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा फायदा होऊ शकतो.

Dahanu Virar railway services
Mumbai Crime : ऑनलाईन गेममध्ये १ कोटी २७ लाखांची फसवणूक

बोईसर एमआयडीसीमध्ये दुसऱ्या पाळीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची गैरसोय लक्षात घेता डहाणू रोड–विरार मार्गावरील शेवटची लोकल १० ते १५ मिनिटांनी उशिरा सोडण्याची मागणी करण्यात आली. यामुळे दुसरी पाळी संपल्यानंतर बोईसर स्थानक गाठणाऱ्या कर्मचाऱ्यांना लोकल पकडणे सुलभ होणार आहे.

डहाणू- विरार मार्गावरील वाढती प्रवासी संख्या आणि रेल्वे सेवांवरील वाढता ताण लक्षात घेता प्रवासी क्षमतेत वाढ, नवीन थांबे तसेच विद्यमान सेवांचे योग्य नियोजन करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली. प्रवाशांच्या प्रश्नांसाठी रेल्वे प्रशासनाशी संवाद साधून व्यवहार्य व प्रवासीहिताच्या उपाययोजनांसाठी पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल, अशी भूमिका ॲड. प्रथमेश प्रभुतेंडोलकर, विराग म्हात्रे व हिमांशू वर्तक यांनी व्यक्त केली.

Dahanu Virar railway services
Mahad MIDC safety concerns : महाड औद्योगिक वसाहतीत सुरक्षा उपायांची वानवा

लाखो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित या मागण्यांचा रेल्वे प्रशासनाने सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.

logo
Pudhari News
pudhari.news