Leopard captured in Dahanu|अखेर डहाणूतील बिबट्या जेरबंद

थर्मल ड्रोन; ट्रॅप कॅमेऱ्यांच्या मदतीने बिबट्याला पिंजऱ्यात कैद, बोईसर वन विभागाची कामगिरी!
leopard captured in Dahanu
leopard captured in Dahanu
Published on: 
Updated on: 

बोईसर : पुढारी वृत्तसेवा

डहाणू तालुक्यातील तणाशी भिमरपाडा येथे वासरांवर हल्ले करून दहशत निर्माण करणाऱ्या बिबट्याला अखेर वन विभागाच्या पथकाने सुरक्षितपणे जेरबंद केले आहे. बोईसर वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डहाणू रेस्क्यू टीमच्या सहकार्याने रात्रभर राबविलेली नियोजनबद्ध शोधमोहीम यशस्वी ठरली. थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे आणि थेट प्रक्षेपण करणाऱ्या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून बिबट्याच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवत पहाटे त्याला पिंजऱ्यात कैद करण्यात आले. या कामगिरीमुळे परिसरातील ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

१० नोव्हेंबर रोजी पहाटे तणाशी भिमरपाडा येथील एका वाडीत बिबट्याने वासरांवर हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेची माहिती मिळताच बोईसर वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी तसेच डहाणू रेस्क्यू टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. बिबट्याचा वावर आणि त्याच्या हालचालींचा अंदाज घेत वन विभागाने परिसरात पिंजरा लावला. मात्र, बिबट्याने दुसऱ्या वासरावरही हल्ला केल्याचे निदर्शनास येताच वन कर्मचाऱ्यांनी तातडीने दुसरा पिंजरा मागवून त्यात भक्ष्य ठेवले. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाने पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली.

थर्मल ड्रोनच्या साहाय्याने परिसरावर नजर ठेवण्यात आली, तर ट्रॅप कॅमेरे आणि थेट प्रक्षेपण करणाऱ्या कॅमेऱ्यांद्वारे बिबट्याच्या हालचालींचे निरीक्षण करण्यात आले. रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास वन कर्मचारी व रेस्क्यू टीमने परिसरातील बाहेर बांधलेली जनावरे एकेक करून गावातील सुरक्षित ठिकाणी हलविली. ग्रामस्थांच्या सुरक्षेला प्राधान्य देत संपूर्ण परिसरात दक्षता बाळगण्यात आली. अखेर ११ नोव्हेंबर रोजी पहाटे बिबट्या पिंजऱ्यात शिरताच वन विभागाच्या मोहिमेला यश आले.

या मोहिमेत उपवनसंरक्षक निरंजन दिवाकर, सहाय्यक वनसंरक्षक रामानुज बांगड यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल पिंपळे, त्यांचे अधिनस्त अधिकारी व कर्मचारी तसेच डहाणू रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विशेष म्हणजे, रात्रीच्या अंधारात आधुनिक उपकरणांचा वापर, सातत्यपूर्ण निरीक्षण आणि योग्य नियोजन यांच्या समन्वयातून ही मोहीम यशस्वी करण्यात आली.

जेरबंद बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणी, आरोग्य परीक्षण आणि ओळख निश्चित करण्यासाठी ठाणे येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये हलविण्यात येणार आहे. दरम्यान, परिसरातील नागरिकांनी रात्री एकट्याने बाहेर पडणे टाळावे, लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये, पाळीव जनावरे सुरक्षित व मजबूत गोठ्यात बांधावीत, तसेच बिबट्या दिसल्यास त्याच्या जवळ जाण्याचा किंवा त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

leopard captured in Dahanu
Vadhavan Port Protest: वाढवण बंदर रद्द करा, अन्यथा रस्त्यावर उतरू; पालघर जिल्हा विनाशकारी प्रकल्प विरोधी संघर्ष समितीचा इशारा

आधुनिक तंत्रज्ञानाला अनुभवाची जोड

अधोरेखित वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत वाढता वावर आणि त्यामुळे निर्माण होणारे संघर्ष ही चिंतेची बाब असताना, तणाशी भिमरपाडा येथील बिबट्या जेरबंद करण्यासाठी बोईसर वनपरिक्षेत्राच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता उल्लेखनीय ठरली आहे. केवळ पिंजरा लावून प्रतीक्षा न करता थर्मल ड्रोन, ट्रॅप कॅमेरे, रात्रभर निरीक्षण आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेचे नियोजन अशा बहुआयामी उपाययोजनांमुळे ही मोहीम यशस्वी झाली. वन विभागाच्या या कामगिरीतून संकटाच्या प्रसंगी योग्य नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि समन्वय किती महत्त्वाचा असतो, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

leopard captured in Dahanu
Nitesh Rane : रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर व रायगडला आता नवी बंदरे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.