

खानिवडे : तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि माणुसकीची जोड मिळाली, तर हरवलेली माणसेही आपल्या माणसांपर्यंत पोहोचू शकतात, याचा प्रत्यय वसई-विरारमध्ये आला आहे. मानसिक अस्वस्थता आणि स्मृतिभ्रंशामुळे घरापासून दूर भरकटलेल्या कर्नाटकातील ७० वर्षीय रजाक बी अक्कूर या आजीला गुगल सर्च तंत्र, ChatGPT आणि पोलिसांच्या समन्वयातून अवघ्या १६ दिवसांत आपल्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्यात जीवन आनंद संस्थेच्या टीमला यश आले आहे. विरार फाटा येथील समर्थ आश्रमातून २२ ऑक्टोबर रोजी आजीची सुखरूप घरवापसी झाली.
कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील रणेबेन्नूर येथील मोमीन गल्ली, क्वारी रोड परिसरात रजाक बी अक्कूर यांचे वास्तव्य आहे. मानसिक अस्वस्थता आणि स्मृतिभ्रंशामुळे त्या चुकीच्या वाहनात बसल्या आणि प्रवासादरम्यान भरकटत थेट महाराष्ट्रातील नालासोपारा येथे पोहोचल्या. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी अचोळे पोलिसांनी त्यांना सुरक्षित निवारा व देखभालीसाठी विरार फाटा येथील समर्थ आश्रमात दाखल केले.
आश्रमात दाखल झाल्यानंतर जीवन आनंद संस्थेचे विश्वस्त किसन चौरे यांनी आजींशी मोडक्या-तोडक्या हिंदी भाषेत संवाद साधत त्यांच्या गावाची, घराची आणि कुटुंबीयांची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्मृतिभ्रंशामुळे त्यांच्याकडून मिळणारी माहिती अपुरी आणि विस्कळीत होती. तरीही आजींना पुन्हा त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचविण्याचा ध्यास संस्थेच्या टीमने सोडला नाही.
विशेष म्हणजे, यापूर्वीही रजाक बी या भरकटत चेन्नई आणि नागपूरच्या दिशेने गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या मुली आणि जावयांनी संबंधित ठिकाणी जाऊन त्यांना घरी आणले होते. यावेळी मात्र तंत्रज्ञान, पोलिस यंत्रणा आणि सामाजिक संस्थेच्या समन्वयातून अवघ्या १६ दिवसांत त्यांचा शोध घेणे शक्य झाले.
या उल्लेखनीय कार्याबद्दल जीवन आनंद संस्थेचे अध्यक्ष संदीप परब यांनी JAS टीमचे विशेष कौतुक केले. समर्थ आश्रमातील भाईदास माळी, चंदा छेत्री, दीपक अडसूळे, दिपाली मेघा-माळी आणि हेमलता पवार यांनी आजीची आवश्यक ती काळजी घेत या संपूर्ण प्रक्रियेत मोलाचे सहकार्य केले.