

पालघर :भातशेतीनंतर शेतकऱ्यांच्या हाती येणाऱ्या पावली आणि नैसर्गिक गवताला खासगी व्यापाऱ्यांकडून अवघे ४ ते ६ रुपये प्रतिकिलो दर दिला जात असल्याने पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचा आरोप कुणबी सेनेने केला आहे. शासनाने सुक्या चाऱ्यासाठी निश्चित केलेल्या १२ रुपये प्रतिकिलो दराच्या धर्तीवर पालघर जिल्ह्यातील पावली व गवताला किमान १२ रुपये दर मिळावा, अशी मागणी कुणबी सेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
पालघर जिल्हा प्रामुख्याने भातशेतीवर अवलंबून असून भात कापणी आणि झोडणीनंतर मोठ्या प्रमाणात पावली उपलब्ध होते. याशिवाय माळराने, गायराने आणि पडीत जमिनीवरील नैसर्गिक गवताची विक्री करून ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांना आर्थिक उत्पन्न मिळते. मात्र, सध्या खासगी व्यापाऱ्यांकडून या पावली व गवताची ४ ते ६ रुपये प्रतिकिलो दराने खरेदी केली जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
दिवाळीच्या तोंडावर पैशांची गरज असल्याने शेतकऱ्यांना नाइलाजाने कमी दरात विक्री करावी लागत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र शासनाने ३० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार सुक्या चाऱ्याची कमाल आधारभूत खरेदी किंमत १२ रुपये प्रतिकिलो निश्चित केली आहे. मात्र, शासनाच्या या निर्णयाचा लाभ पालघरमधील पावली उत्पादक शेतकऱ्यांना मिळत नसल्याची विसंगती कुणबी सेनेने निदर्शनास आणून दिली आहे.
खासगी खरेदी केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी करून खरेदी दर, वजन पद्धती आणि व्यवहारांची चौकशी करावी, दर ठरविण्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये संगनमत आहे का, याची तपासणी करावी, तसेच पावली व गवतासाठी स्वतंत्र खरेदी दर निश्चित करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, १६ ऑक्टोबर रोजी कुणबी सेनेने जिल्ह्यातील आठही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला होता. आता पावली व गवताच्या दराचा प्रश्न ऐरणीवर आणत शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृषी, महसूल, पशुसंवर्धन विभाग आणि शेतकरी प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णय घेण्याची मागणी कुणबी सेनेचे जिल्हा प्रमुख अविनाश पाटील यांनी केली आहे.