

नालासोपारा: ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला विरारमध्ये पैशांच्या कथित वाटपावरून राजकीय वातावरण तापले आहे. बहुजन विकास आघाडीने भाजपावर मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप केला असून, पोलिसांनी घटनास्थळावरून ४ लाख ४ हजार रुपयांची रोकड आणि मतदारांची यादी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
बहुजन विकास आघाडीचे उपसभापती निषाद चोरघे आणि माजी सभापती प्रशांत राऊत यांनी विरार येथील भाजपाच्या कार्यालयात पैशांची पाकिटे वाटली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तेथे धाव घेतली. त्यांनी तेथील रोकड आणि मतदारांची यादी पोलिसांच्या स्वाधीन केली. या घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेचे महापौर अजीव पाटील यांनीही घटनास्थळी भेट दिली.
यावेळी निषाद चोरघे आणि प्रशांत राऊत यांनी निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप केला. मात्र, भाजपाचे शहराध्यक्ष मनीष वैद्य यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत जप्त करण्यात आलेली रक्कम ही भाजपचे सरचिटणीस सुनील ठाकूर यांच्या वैयक्तिक व्यवहाराशी संबंधित असल्याचे स्पष्टीकरण दिले. या रकमेचा निवडणुकीशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, महापौर अजीव पाटील यांनी पोलिसांच्या झडतीत ४ लाख ४ हजार रुपयांची रोकड आढळल्याचे सांगितले. तसेच, जिल्हा बँकेच्या काही मतदारांनी पैसे वाटप होत असल्याची माहिती दिल्यानंतरच आपण घटनास्थळी पोहोचलो आणि हा प्रकार उघडकीस आल्याचा दावा त्यांनी केला.
विरार पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून रोकड आणि संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली असून, ही रक्कम नेमकी कुठून आली, तिचा निवडणुकीशी काही संबंध आहे का, याचा तपास सुरू आहे. मात्र, या प्रकरणाबाबत पोलिसांनी प्रसारमाध्यमांसमोर भाष्य करण्यास नकार दिला आहे.