

बोईसर : उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत असताना आणि वनव्यांनी डोंगररांगा होरपळून निघालेल्या पार्श्वभूमीवर जंगलातील वन्यप्राण्यांसमोर पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. मात्र, वन विभागाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने डोंगर पायथ्याशी वसलेल्या वाळवे गावातील तरुणांनी पुढाकार घेत वन्यप्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय निर्माण केली आहे.
वाळवे परिसरातील जंगलात नैसर्गिक जलस्रोत आटल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात गाव व शहराच्या दिशेने येत आहेत. परिणामी मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक तरुणांनी “जे वन विभागाला जमले नाही, ते आम्ही करून दाखवू” या निर्धाराने प्रत्यक्ष कृतीत उतरून वन विभागाच्या जागेत तलाव तयार केला आहे.
या तलावामध्ये प्लास्टिक ताडपत्री अंथरून टँकरद्वारे पाणी साठविण्यात आले आहे. या उपक्रमामुळे वन्यप्राण्यांना जंगलातच पिण्याचे पाणी उपलब्ध होऊ लागले आहे. या उपक्रमात भूषण साने, सूरज घरत, तुषार पावडे, किशोर पावडे, यतीन देसले, राहुल दळवी, अभिषेक दळवी, प्रणय दळवी व संदेश पावडे या तरुणांचा सहभाग असून नागझरी येथील वैशाली स्टोन क्रशरचे मालक संदीप अधिकारी यांनी टँकर उपलब्ध करून देत सहकार्य केले आहे. वन विभागाच्या निष्क्रियतेवर या घटनेतून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, तरुणांचा हा उपक्रम प्रशासनासाठी एक धडा ठरत आहे.
वाळवे गावातील तरुणांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दाखवलेला पुढाकार सध्या संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे. वन विभागाने दुर्लक्ष केलेल्या प्रश्नावर स्थानिक तरुणांनी स्वतः कृती करून वन्यप्राण्यांसाठी पाण्याची सोय उभी केली, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरते आहे.समाजातून या उपक्रमाचे मोठ्या प्रमाणात कौतुक होत असून, अनेकांनी याला “खरा सामाजिक आदर्श” असे संबोधले आहे. मात्र, या घटनेतून प्रशासनाच्या निष्क्रियतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.वन विभाग आणि स्थानिक प्रशासन या तरुणांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन व्यापक स्तरावर पाणवठे निर्माण करणार का? जंगलातील वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना राबविणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.