

Jalna News: Power supply to agricultural pumps in the Vadigodri area has been cut off
वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा : जायकवाडी धरणातून जलसंपदा विभागाच्या वतीने डाव्या कॅनॉलला पाणी सोडले असून कालव्याचे शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जालन्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या आदेशान्वये वडीगोद्री परिसरातील कृषी पंपांचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. यामुळे या भागातील शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने २६ नोव्हेंबर ते 1 डिसेंबरपर्यंत वीजपुरवठा पुरवठा बंद राहणार आहे. अंबड तालुक्यात भीषण अशा पडलेल्या कोरड्या दुष्काळामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असताना पाणी असतानासुद्धा पाणी पिकांना देता येत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
जायकवाडी धरणातून जलसंपदा विभागाच्या वतीने डाव्या कॅनॉल ला पाणी सोडले असून कालव्याचे शेवटच्या भागापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये वडीगोद्री परिसरातील कृषी पंपाचा वीजपुरवठा बंद करण्यात आलेला आहे. परतूर, अंबड, घनसावंगी या तीन तालुक्यांतील ६९ गावांसाठी हा आदेश जारी केला असून आदेशाचा उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध ही व्यवस्थापन अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सांगितले आहे.
वडीगोद्री परिसरात गहू पिकाची पेरणी व उभ्या असलेल्या ऊसाला पाणी देणे सुरू असून ४ नोव्हेंबर रोजी पैठणच्या डाव्या कालव्याचे पाणी पूर्णपणे बंद करण्यात येणार असून अनेक शेतकऱ्यांचे पिकांना पाणी देणे संपले नसून शेतकरी द्विधा मनस्थितीत आहे.
वडीगोद्रीच्या कॅनलवरून दोदडगाव, शहापूर, टाका, रामगव्हाण, डोणगाव, केकत जळगाव, बारसवाडा आदी वडीगोद्रीपासून दहा ते पंधरा किलोमीटरवर शेतकऱ्यांनी कर्ज काढून पाईपलाईन केलेल्या आहे. त्यामुळे लवकरात लवकर कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. नसता आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी वर्गातून देण्यात आला.