

बोईसर ः आशिया खंडातील सर्वात मोठी तारापूर एमआयडीसी जिथे लाखो कामगार काम करतात, देश-विदेशातील उद्योजक सतत ये-जा करतात आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गाशी जोडणारा बोईसर-चिल्हार मार्ग हा प्रमुख प्रवेशद्वार मानला जातो. परंतु अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता आज अर्धवट, धुळीने माखलेला, खड्ड्यांनी भरलेला आणि प्रशासनाच्या दुर्लक्षाचा बळी ठरला आहे.
साधारण पाच वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून या रस्त्याचे दुपदरीकरण करण्यात आले होते. मात्र अनेक ठिकाणी भूसंपादन न झाल्याने रस्ता अर्धवटच सोडून देण्यात आला आहे. परिणामी रस्त्यावरील अडचणी पाच वर्षांनंतरही जशाच्या तशाच असून या कालावधीत अनेक अपघात झाले, अनेक जण मृत्यूमुखी पडले तर काही कायमचे अपंग झाल्याचे वास्तविकता दिसून येत आहे.
पावसाळ्यात रस्ता इतका दयनीय झाला होता की एमआयडीसी प्रशासनाने हात टेकून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. प्रक्रिया पूर्णही झाली, पण आता परिस्थिती अशी निर्माण झाली आहे की एमआयडीसी खर्च करायला तयार नाही आणि पीडब्ल्यूडी विभाग ही लक्ष देताना दिसून येत नाही. परिणामी संपूर्ण रस्त्यावर प्रचंड धुळीचे थर साचले असून दुचाकीस्वार, पादचारी आणि कामगारांचे हाल अक्षरश: असह्य झाले आहेत.
या रस्त्यालगत राहणाऱ्या नागरिकांचा संताप आता उफाळून आला आहे. “योग्य दुरुस्ती करा, नाहीतर हा जीवघेणा रस्ता बंद करा,” अशी आर्त मागणी नागरिकांकडून होत आहे. नागझरी नाका परिसरात तर आठवडी बाजार भरतो आणि येथे रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की रस्ता ओळखूही येत नाही. मागील वर्षी पावसाळ्यात सामाजिक कार्यकर्ते अमोल गर्जे यांनी गढूळ पाण्याच्या खड्ड्यात बसून आंघोळ करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर थोडीफार डागडुजी झाली, पण आज पुन्हा परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
तारापूर एमआयडीसी हा महाराष्ट्राचा औद्योगिक कणा मानला जातो. राज्याची अर्थव्यवस्था सांभाळणाऱ्या या औद्योगिक पट्ट्याला जोडणारा मुख्य रस्ता अशा अवस्थेत राहणे ही प्रचंड बेपर्वाई असून जिल्हा प्रशासनाने जनतेशी केलेली ही मोठी बेईमानी असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. “राज्यातील सर्वात मोठा औद्योगिक पट्टा, लाखो कामगार, हजारो गाड्या आणि तरीही रस्त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष कसे?” असा थेट सवाल लोकांकडून उपस्थित होत आहे.
तारापूर एमआयडीसी कार्यालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, पालघर या दोन्ही विभागांचे लक्ष या महत्त्वाच्या रस्त्याकडे केव्हा वळणार आणि हे काम अखेर कोण करणार, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे तसेच मुंबई-अहमदाबाद मार्गाने येणाऱ्या उद्योजकांचेही लक्ष लागून आहे.