

Boisar Chilhar Road Accident Youth Killed
बोईसर : बोईसर-चिल्हार रस्त्यावरील वाढत्या अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. मंगळवारी रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास स्टॉप ओव्हर हॉटेल समोर रस्त्यावर बंदवस्थेत उभ्या असलेल्या एका ट्रेलरला भरधाव पिकअप जीपने जोरदार धडक दिली. या अपघातात नागझरी येथील क्रिश क्षत्रीय (वय १९) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. चालक कुणाल पाटील हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बेटेगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
क्रिश यांचे बालपण संघर्षमय होते. लहानपणीच आईने त्याला सोडून दिल्याने त्याचे पालनपोषण आजी आणि आजोबांनी केले. त्यांच्याच आशेचा आधार असलेल्या क्रिशचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अपघाताचे नेमके कारण समोर आले नसले तरी स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरची कोणतीही सूचना, सिग्नल किंवा प्रतिबंधक यंत्रणा नव्हती. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
बोईसर-चिल्हार रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठाले खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी गॅरेज, दुकानांचे अतिक्रमण रस्त्यावरच पसरले असून, ट्रक-ट्रेलर उभे राहण्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. रस्त्याच्या दुतर्फा झाडी व वळणांमुळे अनेकदा समोर येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. त्यातच रात्रीच्या वेळेस अपुऱ्या प्रकाश व्यवस्थेमुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो.
या रस्त्यावरून दररोज हजारो कामगार व नागरिक प्रवास करत असताना रस्त्याची झालेली दयनीय अवस्था, विना परवाना व्यवसायांचे अतिक्रमण आणि एमआयडीसी प्रशासनाची उदासीनता यामुळे अपघात वाढले आहेत. स्थानिकांनी वेळोवेळी निवेदनाद्वारे तसेच आंदोलनाद्वारे या समस्यांकडे लक्ष वेधले. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही.
स्थानिकांकडून एमआयडीसीवर संताप व्यक्त होत असून आणखीन किती जणांचा बळी घेणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. वारंवार अपघात होत असूनही दुरुस्तीचे काम रेंगाळत असल्याने एमआयडीसीच्या हलगर्जीपणावरही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.