

Charoti Toll Naka Gutkha Bust
कासा : मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चारोटी टोलनाका येथे कासा पोलिसांनी केलेल्या कारवाईत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पानमसाला व तंबाखूचा साठा जप्त करत एका तरुणाला अटक केली. या कारवाईत ५ लाख रुपये किमतीची कार आणि ३ लाख ५९ हजार ३०० रुपयांचा प्रतिबंधित माल असा एकूण ८ लाख ५९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही कारवाई चारोटी टोलनाका येथे करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रदीप रावजी गोवारी (वय ४२) यांनी कासा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी सुनीलकुमार बेहेरजी गुप्ता (वय २४, रा. गोवंडी, मानखुर्द, शिवाजीनगर, मुंबई) याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील एमएच-४७-क्यू-२९३६ क्रमांकाच्या मारुती सुझुकी बलेनो कारची तपासणी केली असता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, केसरयुक्त विमल पानमसाला, व्ही-१ विंग तंबाखू तसेच इतर तंबाखूजन्य पदार्थांचा साठा आढळून आला.
पोलिसांनी प्रतिबंधित पदार्थांचा ३ लाख ५९ हजार ३०० रुपयांचा साठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेली ५ लाख रुपये किमतीची कार असा एकूण ८ लाख ५९ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४ व २७५ तसेच अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६, संबंधित नियम आणि महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी एस. एस. मेहेर यांनी कारवाईची पाहणी केली. कासा पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक अमर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अमर पाटील करीत आहेत.