Palghar Gutkha Seized | पालघरमध्ये दीड कोटींचा प्रतिबंधित गुटखा-पानमसाला जप्त

अन्न व औषध प्रशासनाची महामार्गावर धडक कारवाई; ट्रकचालक आणि क्लिनरविरुद्ध गुन्हा दाखल
Palghar FDA Action
Palghar FDA Action Pudhari
Published on: 
Updated on: 

Palghar FDA Action

पालघर : महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. या कारवाईत सुमारे १ कोटी ५० लाख ८६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये १ कोटी ३० लाख ८६ हजार रुपये किमतीचे प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थ आणि सुमारे २० लाख रुपये किमतीच्या ट्रकचा समावेश आहे. याप्रकरणी ट्रकचालक आणि क्लिनरविरुद्ध मनोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रकमधून प्रतिबंधित पदार्थांची वाहतूक

मनोर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील माहितीनुसार, एमएच ४८ सीबी ४६०५ क्रमांकाच्या ट्रकमधून प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची वाहतूक केली जात होती. याप्रकरणी ट्रकचालक कन्हैयालाल कालुराम गेहलोत आणि क्लिनर राहुल हिरालाल दापन यांच्याकडे चौकशी करण्यात आली. मालाच्या खरेदी-विक्रीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली नसल्याचे एफआयआरमध्ये नमूद आहे.

Palghar FDA Action
Palghar Crime: पालघर शहरात वृद्ध महिलेची हत्या; चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज

विविध ब्रँडचा माल जप्त

या कारवाईत विविध ब्रँडच्या प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांचा मोठा साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये प्रीमियम राजनिगंधा सुगंधित पानमसाल्याचे ५९ मोठे बॉक्स, तुलसी रॉयल जाफरानीचे २४ बॉक्स, प्रीमियम आरएमडी पानमसाल्याचे २० मोठे बॉक्स आणि एम स्केंटेड टोबॅको गोल्डचे २४ बॉक्स यांचा समावेश आहे.

जप्त करण्यात आलेल्या या पदार्थांची एकूण किंमत १ कोटी ३० लाख ८६ हजार रुपये असल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. वाहनाच्या किमतीसह जप्त मुद्देमालाचा एकूण आकडा १ कोटी ५० लाख ८६ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

Palghar FDA Action
Palghar Crime : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील तवा गावच्या हद्दीत ७० लाखांचा गुटखा-सुगंधी तंबाखू जप्त!

अन्न व औषध प्रशासनाची धडक मोहीम

अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विभागाच्या कामकाजाला गती मिळाल्याची चर्चा आहे. जिल्ह्यातील महामार्गांवर प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात कारवाया सुरू असल्याचे सांगितले जात आहे. पालघरमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित माल जप्त झाल्याने या अवैध व्यापाराच्या व्याप्तीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. गुजरातमधून महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याची मोठ्या प्रमाणावर तस्करी होत असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

विविध कलमांन्वये गुन्हा दाखल

या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १२३, २२३, २७४, २७५ आणि ३(५), तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम, २००६ मधील कलम २६(२)(i), २६(२)(iv), २७(३)(e), ३(१)(zz)(iv), ३०(२)(a) आणि ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेला प्रतिबंधित माल नेमका कोठून आणण्यात आला होता, त्याचा मूळ पुरवठादार कोण आहे आणि पुढे त्याचे वितरण कुठे केले जाणार होते, याचा तपास सुरू आहे. या तपासातून प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या पुरवठा साखळीबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news