

पालघर ः अपघातांची वाढती संख्या आणि वाहतूक कोंडीमुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग वाहनचालकांसाठी अधिकाधिक धोकादायक ठरत चालला आहे. मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावरील अपघातांसह मृत्यूंच्या संखेत वाढ झाली आहे.मुंबई अहमदाबाद महामार्गाचे व्हाईट टॉपिंगचे काम पूर्ण झाले आहे, परंतु निकृष्ट दर्जाच्या कामामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी केला आहे.
महामार्गावरील अपघातांच्या संख्येबाबत मनोर पोलीस ठाण्यातील आकडेवारीनुसार गेल्या वर्षी (जानेवारी ते डिसेंबर 2024) मध्ये महामार्गावर छोटे-मोठे मिळून 71 अपघात घडले होते.अपघातांमध्ये 31 जण गंभीर जखमी तर 23 जणांचा मृत्यू झाला होता.यंदा जानेवारी ते ऑगस्ट पर्यंतच्या आठ महिन्यांच्या कालावधीत अपघातांचा आकडा 80 पर्यंत पोहोचला आहे. अपघातांमध्ये किरकोळ तसेच गंभीर जखमींचा आकडा 48 तर मृत्यूंमुखी पडलेल्यांची संख्या 42 आहे.गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अपघात आणि मृत्यूंच्या प्रमाणात वाढ झाली आहे.
महामार्गावरील अच्छाड ते घोडबंदर पर्यंतच्या 121 किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे व्हाईट टॉपिंगचे निकृष्ट दर्जाचे काम,अनेक त्रुटी असलेली डिझाईन आणि वाहतुकीवरील नियंत्रणाचा अभाव यामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे मत स्थानिक नागरिक आणि वाहनचालक व्यक्त करीत आहेत. अपघातांची संख्या वाढत असल्यामुळे मुंबई अहमदाबाद महामार्ग धोकादायक ठरत आहे.
‘हॉटस्पॉट’
मनोर,सातीवली, वरई -ढेकाळे वाघोबा खिंडी दरम्यानचा पंधरा किलोमीटर लांबीचा पट्टा अपघात प्रवण क्षेत्र ठरत आहे.या भागात सर्वाधिक अपघात घडले आहेत.मेंढवन खिंड तसेच वाडाखडकोना येथील सीएनजी पेट्रोल पंपासमोर मध्य दुभाजक तोडून केलेला रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत आहे. विरुद्ध दिशेने जाणार्या वाहनांना सोयीचे व्हावे म्हणून उभारण्यात आलेला रस्ता प्रत्यक्षात अपघातांना आमंत्रण देणारा ठरत असल्याची भीती वाहनचालकांनी व्यक्त केली आहे.