Palghar Accident News : चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव एसटी बस झाडावर आदळली; सहा प्रवासी थोडक्यात बचावले
बोईसर: बऱ्हाणपूरहून बोईसरकडे येणाऱ्या भरधाव एसटी बसला किराट गावाजवळ भीषण अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने बस रस्त्यावरून खाली घसरली, मात्र सुदैवाने रस्त्याच्या कडेला असलेल्या एका खजुरीच्या झाडाला धडकून तिथेच अडकल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात बसमधील सहा प्रवासी थोडक्यात बचावले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली. बसचालक अत्यंत वेगाने गाडी चालवत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. मात्र, चालकाने हा आरोप फेटाळत ब्रेक फेल झाल्यामुळे बसवरील नियंत्रण सुटल्याचा दावा केला आहे. ताबा सुटलेली बस थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या खजुरीच्या झाडावर आदळून थांबली.
अपघात होताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्यांनी बसमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या अपघातामुळे मार्गावरील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता. सध्या क्रेनच्या साहाय्याने बसला बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे.

