

Agriculture Assistants Protest on Palghar Agriculture Office
पालघर : पालघर जिल्ह्यातील शेकडो कृषी सहाय्यकांनी बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले असून शेकडो कृषी सहाय्यक यांनी पालघर जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर आज (दि.१९) सकाळपासून धरणे आंदोलन सुरू केले आहे. अनेक मागण्या मागितल्यानंतरही या मागण्या प्रलंबित राहिल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे पालघर शाखेच्या महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. जोवर मागण्या पूर्ण होत नाही, तोवर काम बंद आंदोलन असेच सुरू राहील, असे संघटनेने म्हटले आहे. हे आंदोलन सुरू केल्यामुळे नुकसान भरपाईचे पंचनामे करणार कोण असा प्रश्न कृषी विभागासमोर उपस्थित झाला आहे.
कृषी सेवक कालावधी रद्द करून त्यांना नियमित कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती देण्यात यावी, अशी प्रमुख मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. तर हे पदनाम बदलून सहाय्यक कृषी अधिकारी असे पदनाम निर्मित करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. सध्या कृषी विभाग पूर्णपणे डिजिटल प्रणालीवर सुरू आहे. असे असताना कृषी सहायकांना लॅपटॉप दिले जात नाही. त्यामुळे त्यांना काम करणे अवघड होऊन बसले आहे. कामासाठी लॅपटॉपही दिले जावेत, अशी ही मागणी करण्यात आली आहे. गाव पातळीवर काम करताना तलाठी व ग्रामसेवक यांना मदतनीस दिला जातो.
मात्र, कृषी सहायकाला अनेक कामे असल्यामुळे त्यांच्यावर कामाचा तणा पडतो. अशावेळी सहाय्यकांनाही कृषी मदतनीस द्यावी, अशी मागणी संघटनेची आहे. कृषी पर्यवेक्षक ही पदे वाढवून कृषी सहाय्यकांच्या पदोन्नतीमधील त्रुटी दूर करून आकृतीबंध तयार करण्याची मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे. अशा एकूण ११ विविध मागण्या संघटनेने राज्य शासनासह जिल्हा कृषी अधीक्षक प्रशासनाकडे मागितले आहेत. त्या संदर्भातील निवेदन त्यांनी विभागाकडे सुपूर्त केले आहे. याआधीही वारंवार आंदोलने झाली आहेत. मात्र, मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केल्यामुळे बेमुदत काम बंद आंदोलन संघटनेच्या सदस्यांकडून सुरू करण्यात आले आहे, असे आंदोलनकर्ते कृषी सहाय्यकांनी म्हटले आहे.
अवकाळीमुळे पालघर जिल्ह्यातील बागायतदार, शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले असून याच दरम्यान पालघर जिल्ह्यातील कृषी सहाय्यक यांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे नुकसान भरपाईच्या पंचनाम्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. कृषी सहाय्यक गाव पातळीवर जाऊन ते पंचनामे महसूल विभागाच्या समन्वयाने करत असतात. मात्र आता कृषी सहाय्यक स्वतःच आंदोलनात सामील झाल्याने हे पंचनामे करणार कोण असा प्रश्न निर्माण होत आहे. याच सोबत खरीप हंगाम तोंडावर आहे. कृषी विभागाशी संबंधित गाव पातळीवरील सर्व कामे कृषी सहाय्यकांमार्फत केली जातात. सद्यस्थितीत कृषी सहाय्यकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू असल्यामुळे ही कामे कोलमडणार असेच एकंदरीत दिसून येत आहे.