

Migrant Auto Driver Remark : "मराठी बोलणार नाही, तुला बोलायचे असेल तर हिंदी किंवा भोजपुरीमध्ये बोल, अशी मुजोरी करत एका स्थानिक तरुणाशी अरेरावी करणाऱ्या परप्रांतीय रिक्षाचालकाला विरारमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. तसेच त्याने केलेल्या गैरवर्तनाबद्दल जाहीर माफी मागण्यास भाग पाडले.
काही दिवसांपूर्वी विरार रेल्वे स्थानक परिसरात एका स्थानिक तरुणाने एका रिक्षाचालकाशी मराठीत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित परप्रांतीय रिक्षाचालकाने मराठीत बोलण्यास स्पष्ट नकार दिला. इतकेच नव्हे, तर "इथे राहायचे असेल तर हिंदीत बोलावे लागेल," अशा शब्दात त्याने तरुणाला दमदाटीही केली. तसेच हिंदी व भोजपुरी भाषेत बोलण्यास भाग पाडले. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ एका नागरिकाने आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केला आणि तो सोशल मीडियावर प्रसारित झाला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळली. मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका घेत दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या मुजोर रिक्षाचालकाचा शोध सुरू केला.
आज, शिवसेना (उबाठा) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी संबंधित रिक्षाचालकाला विरार स्थानक परिसरातच शोधून काढले. ज्या ठिकाणी त्याने तरुणाशी अरेरावी केली होती, त्याच ठिकाणी त्याला जाब विचारण्यात आला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला भररस्त्यात चोप दिला. या कारवाईनंतर, कार्यकर्त्यांनी त्याला ज्या तरुणाशी गैरवर्तन केले होते, त्याची आणि समस्त महाराष्ट्राची माफी मागण्यास सांगितले."मराठी भाषेचा आणि महाराष्ट्राती थोर व्यक्तींचा अपमान केल्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागतो," असे म्हणत रिक्षाचालकाने सार्वजनिकरित्या माफी मागितली. या संपूर्ण घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
या कारवाईनंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विरार शहरप्रमुख श्री. उदय जाधव म्हणाले, "महाराष्ट्रामध्ये राहून मराठी भाषेचा, महाराष्ट्राचा किंवा इथल्या मराठी माणसाचा कोणीही अपमान करत असेल, तर त्याला शिवसेना पद्धतीनेच प्रत्युत्तर दिले जाईल. ही मुजोरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही," असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.
नुकतेच १ जुलै रोजी भायंदर येथे मराठीत बोलण्यास नकार देणाऱ्या एका खाद्यपदार्थ विक्रेत्याला मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. या घटनेच्या निषेधार्थ परप्रांतीय व्यापाऱ्यांनी आंदोलन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून ८ जुलै रोजी मनसे, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी एकत्र येत 'मराठी अस्मिता मोर्चा' काढला होता. या आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतले होते.