बोईसर : पुढारी वृत्तसेवा : पालघर तालुक्यातील दांडी येथे एका पिसाळलेल्या श्वानाने नऊ जणांवर हल्ला करून चावा घेतल्याने परीसरात दहशत निर्माण झाली आहे. चावा घेतलेल्या नऊ पैंकी सहा जणांवर दांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले, तर गंभीर जखमा झालेल्या तीन जणांना उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. भटके आणि पिसाळलेले श्वान नागरिकांवर सातत्याने हल्ला करण्याच्या घटना सातत्याने होत असल्याने दहशत पसरली असून निर्बीजीकण मोहीम अधिक व्यापक व गतीने करण्याची मागणी होत आहे.
संबंधित बातम्या
दांडी येथे या आठवड्यात पिसाळल श्वानाने एकूण नऊ जणांवर हल्ला करून चावा घेतला. नऊ पैंकी कमी तीव्रतेचा चावा घेतलेल्या सहा जणांना दांडी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्यांच्यावर आवश्यक उपचार व अँटी रेबिज लस देऊन घरी सोडण्यात आले आहे. तर श्वानाच्या चाव्याने खोलवर जखमा झालेल्या रुग्णांना देण्यासाठी आवश्यक असलेल्या इम्युनोग्लोबुलीन लसीचा साठा दांडी आरोग्य केंद्रात उपलब्ध नसल्याने तीन जणांना डहाणू येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तीन जणांपैंकी एका रुग्णावर उपचार करून त्याला घरी सोडण्यात आले तर दोन जणांवर उपचार सुरू असल्याची माहीती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली.
पालघर जिल्ह्याच्या किनारपट्टीच्या गावांमध्ये तसेच पर्यटनाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या ठिकाणी श्वानांचे निर्बिजीकरण करण्याचा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाकडून हाती घेण्यात आला आहे. या मोहीमे अंतर्गत दांडी प्राथमिक आरोग्य केंद्र विभागात असलेल्या अंदाजे एक हजार भटक्या श्वानांपैंकी जवळपास 850 श्वानांचे निर्बिजीकरण करण्यात आले असून गर्भार असलेल्या किंवा नुकतीच प्रसूती झालेल्या मादी श्वान अधिक आक्रमक असल्याने त्यांचे निर्बिजीकरण करण्यात अडचणी येत असून दांडी येथे नऊ जणांना चावा घेतलेली मादी श्वान गर्भार असल्याने तिचे निर्बीजीकरण करण्यात आले नसल्याची शक्यता असल्याची माहीती जिल्हा पशुधन अधिकारी डॉ.प्रकाश हसनाळकर यांनी दिली.