पालघरच्या वेवजी, झाई गावात गुजरातची घुसखोरी; २ मराठी गावे बळकावण्याच्या हालचाली

पालघरच्या वेवजी, झाई गावात गुजरातची घुसखोरी; २ मराठी गावे बळकावण्याच्या हालचाली

पालघर; विनायक पवार : कर्नाटकने बळकावलेली ८६५ मराठी गावे महाराष्ट्राला अजूनही परत मिळवता आलेली नसतानाच आता गुजरातनेही पालघर जिल्ह्यात घुसखोरी करत दोन मराठी गावे बळकावण्याच्या हालचाली चालवल्या आहेत. पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी आणि झाई या गावात असलेला सीमादर्शक दगड सुमारे १५० मीटर महाराष्ट्राच्या बाजूला आतमध्ये सरकवून गुजरातने आपली हद्द वाढवल्याने इथे नवा संघर्ष उद्भवला आहे.

सीमेवरील तलासरी तालुक्यातील झाई गावापासून गुजरातच्या उंबरगाव तालुक्यातील गोवाडा ग्रामपंचायतीची हद्द फक्त १५० ते २०० मीटर अंतरावर आहे. या ठिकाणी दोन राज्यांना वेगळे करणारा एक पूल आहे. महाराष्ट्राच्या दिशेने पुलाच्या अलीकडे पूर्वी असणारा सीमा दर्शवणारा सीमादर्शक दगड खाजण जमिनीतील चिखलाखाली गाडला गेल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यानंतर असाच एक नवीन सीमा दर्शविणारा दगड महाराष्ट्राच्या हद्दीत झाई गावातील माच्छी पाडा परिसरात बसविण्यात आल्याचे स्थानिक सांगतात. गुजरातच्या या घुसखोरीला स्थानिकांकडून विरोध न झाल्यामुळे गुजरात शासनाने महाराष्ट्राचा हा भाग सहज बळकावल्याचे येथील रहिवाशी सांगतात.

गुजराती ग्रामपंचायतींची नोटिस

गुजरात शासनाकडून ८० च्या दशकात बेघर कुटुंबांना हक्काची घरे बांधून देण्यासाठी नवीनगरी नावाची योजना राबवण्यात आली होती. त्याच दरम्यान महाराष्ट्रातील काही बेघर गरीब कुटुंबांना घरांचे प्रलोभन देऊन गुजरातमध्ये समाविष्ट करण्यात आल्याचे सांगण्यात येते. सध्या सीमाभागातील एकाच गावातील घरे महाराष्ट्रातील झाई (मच्छी पाडा) आणि गुजरातमधील गोवाडा नवीनगरी या दोन ग्रामपंचायत हद्दीत असल्याचे चित्र आहे. या लगतच्या गावांमधील रहिवासी सीमावाद विसरून गुण्यागोविंदाने एकत्र राहत असले तरी महाराष्ट्रात नोंदणी असलेल्या घरांना गुजरात मधील गोवाडा ग्रामपंचायतींनी नोटिस बजावून त्रास देणे सुरू केल्याचे दिसून येते.

घर जाण्याची माच्छींना भिती

झाईमधील माच्छी पाडा येथील रमेश शंकर माच्छी यांच्या घराची नोंद महाराष्ट्रात असताना त्यांना घर रिकामी करावे अन्यथा घर पाडण्यात येऊन घर पाडण्याचा खर्च वसूल केला जाईल अशी नोटिस गोवाडा ग्रामपंचायत कडून २०२० मध्ये बजाविण्यात आली होती. त्या नोटीसला घाबरून न जाता माच्छी यांनी ग्रामपंचायतने केलेल्या दाव्याचे पुरावे मागितले. त्यानंतर गोवाडा ग्रामपंचायतीची कोंडी झाली आणि मग हा विषय तसाच पडून राहिला.

झाई गावातील माच्छीपाडा येथे एकूण ३६ कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून वास्तव्य करतात. यातील ३४ कुटुंबांची नोंद गुजरात राज्यात असून त्यांचा मतदानाचा हक्क गुजरात मध्ये आहे. मुळात ही सर्व घरे महाराष्ट्रात असताना त्यांची नोंद गुजरात मध्ये झाल्यामुळे, ही घरे असलेला भाग गुजरात राज्याच्या हद्दीत असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, येथीलच रमेश माच्छी व त्यांचे भाऊ यांनी विरोध दर्शवत आम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असून महाराष्ट्रातच राहणार आहोत असा पवित्रा घेतल्यामुळे महाराष्ट्रात घुसखोरी करू पाहणाऱ्या गुजरातच्या गोवाडा ग्रामपंचायतचा नाईलाज झाला. त्यामुळे या भावंडांपैकी रमेश माच्छी यांना नोटीस बजावून त्रास देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

२२ डिसेंबरला बैठक

गुजरातने निर्माण केलेल्या या सीमा प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी डहाणू विधानसभा आमदार विनोद निकोले यांनी सर्व शासकीय यंत्रणांची २२ डिसेंबर रोजी बैठक बोलावली असून तलासरी तहसीलदारांसह दोन्ही सीमा भागातील सर्व कागदपत्रे आणि संबंधित जागेच्या मोजणी नकाशांसह उपस्थित राहण्याची सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

एकाच गावात दोन राज्ये

झाई गावातील माच्छीपाडा व गुजरात मधील गोवाडा नवीनगरी हे एकाच वस्तीत असल्याचे विचित्र दृश्य आहे. अवघ्या ३६ घराच्या वस्तीत दोन राज्यांचे राज्य पाहायला मिळत आहे. ८० च्या दशकात गुजरात शासनाने राबवलेल्या एका योजनेच्या आड महाराष्ट्र हद्दीतील गरीब कुटुंबांना घरांचे प्रलोभन देऊन गुजरात मध्ये नोंद करून घेतल्याचे समजते.

रस्त्याने बदलले राज्य

मच्छी पाडा वस्ती मध्ये गुजरात शासनाकडून एक वस्ती रस्ता तयार करण्यात आला आहे. या रस्त्याच्या उत्तरेकडील घरे गुजरातमध्ये तर दक्षिणेकडील घरे महाराष्ट्रात असल्याचा दावा गुजरात कडून केला जातो. मात्र, गुजरात सरकारच्या या दाव्याला महाराष्ट्रातील नागरिकांनी फेटाळून लावत गुजरात सरकार महाराष्ट्रात अतिक्रमण करू पाहत असल्याचा आरोप केला आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news