पालघर : समूह विकास योजनेतून चिकूचे होणार मूल्यवर्धन | पुढारी

पालघर : समूह विकास योजनेतून चिकूचे होणार मूल्यवर्धन

निखिल मेस्त्री

पालघर : पालघर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध रसाळ चिकूच्या मूल्यवर्धनासाठी घोलवड बोर्डीमधील चिकू बागायतदार आणि राज्य शासनाच्या उद्योग संचालनालयामार्फत समूह विकास योजना (चिकू क्लस्टर) विकसित करण्यात आली आहे. चिकू हे नाशवंत फळ असल्याने अत्याधुनिक चिकू प्रक्रिया केंद्राच्या माध्यमातून चिकू मूल्यवर्धनासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.

घोलवड, डहाणू येथील चिकूला अलीकडेच भौगोलिक मानांकन प्राप्त झाले आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून बोर्डीजवळील ब्राह्मणगाव येथे हे सामान्य सुविधा केंद्र उभारण्यात आले आहे. डहाणू तालुक्यात 300 ते 400 टन चिकू हंगामात दर दिवस उत्पादित होतो. हंगाम सोडला तर दर दिवशी 60 टनाच्या जवळपास उत्पादन होते.

लवकरच उद्घाटन

प्रनील सावे, अध्यक्ष अमोल पाटील, संगीता सावे, प्रतीश राऊत, सिद्धार्थ पाटील, अनिकेत राऊत यांच्यासह 40 लघुउद्योजक शेतकर्‍यांनी एकत्र येऊन महत्त्वपूर्ण चिकू प्रक्रिया प्रकल्प उभा केला. लवकरच या प्रकल्पाचे उद्घाटन केले जाणार आहे.

असे आहे केंद्र

वर्षभर चिकू टिकावा म्हणून रोज 5 टन प्रतिदिन फळ टिकवण्याची व्यवस्था
शास्त्रीय पद्धतीने फळ पिकवण्यासाठी इथिलीन वायूचा वापर
नैसर्गिक पद्धतीने पिकविलेल्या फळासारखा गोडवा
सुक्या चकत्या बनवण्यासाठी इलेक्ट्रिकल ड्रायरचा वापर
पावसाळ्यातही चिकूवर प्रक्रिया करणे सोपे
फळाची भुकटी व पॅकिंग करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे व उपकरणे

Back to top button