शिवराज्याभिषेक सोहळा : हिंद, अरबी सागरासोबत गंगा, सिंधूचे जल रायगडी रवाना

पालघर; बाबासाहेब गुंजाळ : भारतीय इतिहासातील सर्वात मोठा सुवर्ण अक्षरांनी कोरलेला दिवस म्हणजे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १५९६ (शालिवाहन शके) रोजी किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधिश्वर झाले. ते केवळ ते महाराज म्हणजे राजा नव्हे तर ते शककर्ते झाले. शिवराज्याभिषेक शक त्या दिवसापासून सुरू झाले. किल्ले रायगडावर या वर्षी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा होणार आहे. या सोहळ्याला महाराष्ट्र भरातून नव्हे तर देशभरातून एक हजार एकशे एक ठिकाणांवरून आणलेल्या पवित्र जलाचा अभिषेक केला जाणार आहे.
श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगड हे राज्यभरातील १०० पेक्षा जास्त विविध संस्था यांच्या वतीने राज्याभिषेक सोहळा आयोजित करीत आहेत. यंदाचे हे समितीचे २८ वे वर्ष आहे. यंदा महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग व समिती यांनी जलाभिषेक संकल्पना राबवली. काश्मीर ते कन्याकुमारी आसाम ते गुजराथ येथील सर्व पवित्र स्थानावरून जल गोळा केले आहे. विविध ठिकाणी जल गोळा करून एका रथावरून हे जल किल्ले रायगडाकडे रवाना झाले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल बैस व सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पूजन करून हया रथाला मुंबईतून रवाना केले गेले आहे. मुंबईतून अनेक ठिकाणी शिवभक्त या जलंच्या कलशाचे पूजन करून किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी रवाना होत आहेत. दिनांक २६ मे रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास राजभवनातील सोहळ्या नंतर रथ रवाना झाला आहे. दोन दिवस मुंबईतून बाहेर पाडण्यासाठी या रथाला लागणार आहे. इतक्या मोठ्या उत्साहात शिवभक्त या रथाचे स्वागत करत आहेत.
सोहळ्याचा उत्साह
अनेक आमदार खासदार नगरसेवक समाजसेवक रथाचे स्वागत करीत आहेत. आपले राजे छत्रपति होणार हा सोहळा उत्साहात साजरा होणार आहे. रायगड जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळ्याची तयारी सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना रायगडावरील ह्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विशेष निमंत्रण दिले असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.