पालघर : बंधाऱ्यातील क्षारयुक्त पाण्यामुळे हंगामी रब्बीपिके धोक्यात | पुढारी

पालघर : बंधाऱ्यातील क्षारयुक्त पाण्यामुळे हंगामी रब्बीपिके धोक्यात

खानिवडे; पुढारी वृत्तसेवा :  वसई पूर्वेतील तानसा खाडीवर असलेल्या खानिवडे बांधाऱ्याची पाणी साठवणूक क्षारयुक्त झाल्याने या पाण्यावर घेण्यात येणारी रब्बी पिके तसेच वाडीची पिके धोक्यात आली आहेत. एकंदरीतच उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकरी वर्तवत आहेत.

वसई पूर्वेच्या भाग हा शेती बागायती चा असून खरीप हंगाम आटोपल्यानंतर येथे रब्बी हंगामातील वाल, तूर, चणा, उडीद, मूग, तीळ या कठवळी पिकांसह भेंडी, गवार, चवळी, टोमॅटो वांगी, मिरची आदी भाजी पिके घेतली जातात. तर वसईचा प्रसिद्ध सफेद कांदा याचीही मोठी लागवड केली जाते. या पिकांमधील कठवळ पिके सोडली तर इतर पिकांना सिंचन म्हणून खानिवडे व उसगाव भाताणें या बांधाच्या साठवणूक केलेल्या पाण्याचा वापर केला जातो. यात खानिवडे येथील बंधारा हा तानसा खाडीवर असल्याने थेट एक बाजूला दिवसात दोनदा येणाऱ्या भरतीचे खारे पाणी तर दुसऱ्या बाजूला पावसाळ्यात वाहून जाणारे अडवून साठवणूक केलेले पाणी अश्या अवस्थेचा आहे.

यंदा हा बंधारा थोडा उशिरा बंदिस्त करण्यात आल्याने साठवणुकीत आधीच पाणी मुचळ झालेले होते. त्यात जीर्ण झालेल्या बांधाऱ्याला लागलेल्या गळतीमुळे आणि बंदिस्तीच्या फळ्या निसटल्याने भरतीचे खारे पाणी मिसळून आता क्षारयुक्त झाले आहे. हे पाणी वरील पिकांना सिंचन केल्याने त्या पिकांची प्रतवारी घटण्याची शक्यता निर्माण झाली असून पिके घेण्यासाठी लावलेला खर्च तरी निघेल का या विवंचनेत शेतकरी पडले आहेत. सदर बांधारा हा १९८४ साली बांधण्यात आला असून त्याला आता खालच्या बाजूने जागोजागी गळती लागल्याचे दिसत आहे. यासाठी पाणी विभागाने दुरुस्ती कामे केली असली तरी गळती सुरूच असल्याने साठवणूक दिवसेंदिवस खारी होत चालली आहे.

यासाठी संबंधित विभागाने योग्य दुरुस्ती अथवा नवीन बांधारा बांधण्याची मागणी आता शेतकरी करत आहेत.
दरसाल जांभूळपाडा, नवसई, भाताणे, भालीवली येथे सफेद कांद्याची लागवड केली जाते. ही लागवड उसगाव पांढरतारा या बंधाऱ्याच्या खालच्या बाजूने असलेल्या खानिवडे बंधाऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असते. यंदा या बंधाऱ्याची साठवणूक क्षारयुक्त झाली आहे. त्यामुळे लागवड धोक्यात आली आहे. हत्ती पाडा धरणातील पाणीही अजून न सोडल्याने सिंचनां नंतर वाहणारे झरे बंद झाल्याचा ही परिणाम साठवणूक क्षारयुक्त झाल्याचे सांगितले जाते आहे.

Back to top button