बोईसर : आशिया खंडातील सर्वात मोठे औद्योगिक केंद्र म्हणून ओळख असलेल्या तारापूर औद्योगिक क्षेत्रात वाढत्या अपघातांनी कामगार सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. मागील पाच वर्षांत तब्बल ९१ औद्योगिक अपघातांची नोंद झाली असून त्यात ४८ कामगारांचा मृत्यू आणि ९० जखमींची नोंद औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाकडे झाली आहे.
तारापूर - बोईसर औद्योगिक क्षेत्रात १ हजार ४५ नोंदणीकृत कारखाने कार्यरत असून त्यात प्रामुख्याने रासायनिक, औषधनिर्मिती, पोलाद आणि कापड प्रक्रिया उद्योगांचा समावेश आहे. या कारखान्यांमध्ये सुमारे दोन लाख कामगार आणि अधिकारी वर्ग कार्यरत आहे. औद्योगिक क्षेत्रामुळे परिसराचा आर्थिक विकास झाला असला तरी आग, वायुगळती आणि स्फोटासारख्या घटना वारंवार घडत असल्याने कामगारांचे प्राण धोक्यात आले आहेत.
संचालनालयाच्या आकडेवारीनुसार, यांत्रिक बिघाड, मानवी निष्काळजीपणा, अपुरे प्रशिक्षण, असुरक्षित कार्यपद्धती ही अपघातांची प्रमुख कारणे आहेत. मागील दोन वर्षांतच १७ प्राणघातक अपघात झाले असून या काळात ७० लाख २५ हजार रुपये नुकसानभरपाई आणि २९ लाख २५ हजार रुपये सानुग्रह अनुदान मयत कामगारांच्या कुटुंबियांना मिळवून देण्यात आले आहे.
तथापि, औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यांची नियमित तपासणी आणि देखरेखीसाठी विभागाकडे मनुष्यबळाची टंचाई असल्याचे मान्य करण्यात आले आहे. आतापर्यंत २४४ कारखान्यांविरुद्ध फौजदारी खटले दाखल करण्यात आले आहेत. कारखान्यांमधील प्रेशर व्हेसल, लिफ्टिंग टॅकल आदी यंत्रसामग्रींची तपासणी सुद्धा सक्षम व्यक्तीकडून करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मेडली फार्मास्युटिकल्स (ऑगस्ट २०२५): ४ कामगार मृत, २ जखमी
तारा नायट्रेट कंपनी (जानेवारी २०२०): ७ मृत, ७ जखमी
आरती ड्रग्स (मार्च २०१३): ५ मृत, १८ जखमी
रिस्पॉन्सिव्ह कंपनी (३१ ऑक्टोबर २०२५): यंत्रबिघाडामुळे लागलेल्या आगीत ३ कामगार गंभीर
तारापूर औद्योगिक क्षेत्रात धोकादायक रसायनांचा मोठ्या प्रमाणावर वापर असल्याने आग, स्फोट आणि वायुगळतीची शक्यता कायम असते. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत कारखान्यांची काटेकोर तपासणी केली जाते. कारखाने अधिनियम १९४८ आणि महाराष्ट्र कारखाने नियम १९६३ अंतर्गत उल्लंघन आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येते. तसेच मागील दोन वर्षांत १६ सुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यात आले आहेत.
माधव तोटेवाड, सहसंचालक औद्योगिक सुरक्षा व आरोग्य विभाग, पालघर