पालघर : आर्थिक वादातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या  | पुढारी

पालघर : आर्थिक वादातून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हत्या 

तलासरी; पुढारी वृत्तसेवा :  तलासरी तालुक्यात आर्थिक वादातून एका १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एका ४५ वर्षीय इसमाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा गळा दाबून खून केल्याचे समोर आले आहे. अवघ्या १२ तासांत तलासरी पोलिसांनी उपलब्ध माहिती आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे आरोपी रमेश दुबळा याला अटक केली आहे.

तलासरी तालुक्यातील आरोपी रमेश दुबळा हा या मुलीच्या शेजारी राहत असून घरगुती वादातून तिचा खून केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. घरगुती वादासोबत मच्छिमार बोटीवर जाण्यासाठी घेतलेले पैसे व आर्थिक देवाणघेवाणीवरून ही त्याचे वाद होते, असे बोलले जात आहे.

बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास नातेवाईक, आई-वडिलांनी पोलिसांना ती रात्री उशिरापर्यंत घरी आली नसल्याची माहिती दिली. पोलिसांनी ती माहिती नोंद करून मुलगी अल्पवयीन असल्याने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सदर घटनेची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिली. ही गंभीर बाब लक्षात घेत त्यांनी तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय वसावे यांच्या नेतृत्वाखाली चार पथके तयार केली व शोध मोहीम राबवायला सांगितले. पोलीस पथकाने तपासचक्र फिरवून बारा तासांच्या आत या खुनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर तलासरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून खून केलेल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात  पाठवण्यात आला आहे.

  • आर्थिक वाद झाल्याचा राग मनात धरून दुबळा याने या अल्पवयीन मुलीला शाळेत जात असताना शाळेत सोडतो, असे सांगून रस्त्यावर आपल्या मोटरसायकल वरून घेऊन गेला. मात्र, त्या मुलीला शाळेत न सोडता तिच्या घराच्या दहा ते पंधरा किलोमीटर लांब गुजरातमध्ये नेले. गुजरातमधील भिलाड-संजण रस्त्यावरील जंगलातील झाडाझुडपात त्याने तिच्यावर बलात्कार केला व त्यानंतर गळा दाबून खून केला, अशी कबुली आरोपीने पोलिसांकडे दिली आहे.

Back to top button